उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘गोदावरी’ चित्रपटाची झलक प्रदर्शित; ११ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

मुंबई : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडणारा अभिनेता जितेंद्र जोशी याची पहिली निर्मिती असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटाची झलक सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित झाली असून ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये गोदावरी प्रदर्शित होणार आहे.गोदावरी नदी ही आपल्या महाराष्ट्राची जीवनदायीनी आहे आणि गोदावरीप्रमाणेच इतर नद्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे मत फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. दुषित पाणी नद्यांमध्ये जात असल्याने नद्यांच्या शुद्धीकरणासाठी अमृत महोत्सव योजनेअंतर्गत शंभर टक्के निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याची माहितीही त्यांनी दिली. करोना काळात आपल्या जवळच्या मित्राला, निशिकांत कामतला गमावल्यानंतर अस्वस्थ प्रेमासह लेखक दिग्दर्शक निखिल महाजनच्या साथीने सुरू केलेला शोध गोदावरी नदीकाठी येऊन पोहोचला आणि मग हा शोध गोदावरी चित्रपटापर्यंत गेल्याचे मनोगत अभिनेता आणि निर्माता जितेंद्र जोशीने व्यक्त केले.प्रदर्शनाआधीच आंतरराष्ट्रीय महोत्सवात डंका

या चित्रपटात निशिकांत ही प्रमुख भूमिका जितेंद्र जोशीने साकारली आहे. इफ्फी महोत्सवात जितेंद्र जोशी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारदेखील पटकावला असून ६० वर्षातील या स्पर्धेत हा पुरस्कार पटकावणारा जितेंद्र चौथा भारतीय अभिनेता आहे. तसेच, भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ हा एकमेव मराठी चित्रपट होता. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, वॅनकुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ ने आपला झेंडा रोवला आहे.

कथा गोदावरीची

‘गोदावरी’ ची गोष्ट ही जुन्या नाशिकमधील एका कुटुंबाची आहे. वडिलोपार्जित व्यवसायाची जबाबदारी बळजबरीने सोपवली गेल्यामुळे आयुष्याकडे नकारात्मकरित्या पाहणाऱ्या तरुणाची म्हणजेच निशिकांत देशमुखची आहे. सततची चिडचीड, भांडण, नाखुशी याचा नकळत जवळच्या व्यक्तींवर आणि नातेसंबंधांवर झालेल्या परिणामामुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या निशिकांतच्या आयुष्यात अशी काही अनपेक्षित बातमी येते आणि त्याचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. या घटनेमुळे निशिकांत स्वतःकडे, कुटुंबाकडे, परंपरेकडे आणि गोदावरीकडे नव्याने पाहु लागतो.या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांची प्रमुख भूमिका आहे. तर प्राजक्त देशमुख आणि निखिल महाजन यांनी चित्रपटाचे लेखन केले असून दिग्दर्शन निखिल महाजन यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने