डेपोतील कचरा रस्त्यावर.

कंदलगाव : वाढणाऱ्या नागरी वस्त्या, कॉलन्यांमुळे दोन-दोन घंटागाड्या रोज फिरत असूनही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कचऱ्याची पिशवी डेपोत न टाकता रस्त्याकडेला फेकली जाते. यामुळे कचरा डेपोत कमी आणि रस्त्यावर जास्त दिसत आहे. चार दिवस पडून राहिलेल्या कचऱ्यातील दुर्गंधीने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

कंदलगाव मुख्य रस्त्यावर कचरा डेपो असून त्यामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. डंपिंग परिसर माळावर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वारे वाहत असल्याने डंपिंगमधील प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा वाऱ्यामुळे परिसरात पसरत असल्याने स्थानिकांना त्रास होत आहे. संबंधित मोरेवाडी ग्रामपंचायतीने रस्त्याकडेला पसरलेला कचरा डेपोत टाकावा, अशी मागणी होत आहे.


वीस कॉलनीतील कचरा

मोरेवाडी परिसरातील वीस कॉलनीतून कचरा गोळा करून येथे टाकला जातो. कचरा डेपोसाठी मुबलक जागा असूनही घाईगडबडीत कचरा टाकून पळ काढला जातो. प्रशासनाने योग्य नियोजन करून कचरा डंपिंगसाठी सूचना द्याव्यात.डंपिंग परिसरात बेघर वसाहत,आरटीओ सर्कल व भारती विद्यापीठसारखे महाविद्यालय असल्याने हा परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. पसरलेला कचरा एकत्र करणे गरजेचे आहे.

संबंधित ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज दिली आहे. दोन दिवसांत कचरा एकत्र करून डेपोत टाकण्यात येईल.- रूपाली बाजारी, सरपंच मोरेवाडी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने