‘झुंड’च्या यशानंतर नागराज मंजुळे घेऊन येत आहेत ‘घर बंदूक बिरयानी’, चित्रपटाबाबत नवी माहिती समोर

मुंबई :  यावर्षी मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चक्क अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘झुंड’ हा चित्रपट सादर केला. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली, काहींनी यावर टीकासुद्धा केली. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिणात्य कलाकारांनी या चित्रपटाचं कौतूक केलं. एकूणच या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ‘सैराट’सारखा हा चित्रपट हीट ठरला नसला तरी नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला.आता नागराज मंजुळे पुन्हा एक आगळावेगळा प्रयोग आपल्यासाठी घेऊन येत आहेत. गेल्याच वर्षी नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओनी एका चित्रपटाची घोषणा केली होती. नाव होतं ‘घर, बंदूक, बिरयानी’. या चित्रपटाचा एक छोटासा टीझर गेल्यावर्षी प्रदर्शित केला होता. या टीझरमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. वेगळं नाव आणि वेगळ्या ढंगात तो टीझर सादर केल्याने लोकांनी त्याला पसंती दर्शवली होती.

आता याच चित्रपटाबाबत झी स्टुडिओने मोठी घोषणा केली आहे. ‘झी स्टुडिओ’ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाचा नवा टीझर येत्या २५ तारखेला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं पोस्ट केलं आहे. याबरोबरच या चित्रपटाचा पोस्टरदेखील शेअर केलं असून हा चित्रपट मराठी, हिंदीसह इतर २ दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहेनागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली असून हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याबरोबरच या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचं असून २५ तारखेला याचा टीझर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार याची खूप उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने