राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : कलात्मक योगात महाराष्ट्राच्या संघांचे सोनेरी यश; तालबद्ध योगात छकुली-कल्याणीला सुवर्णपदक.

अहमदाबाद : योगासनात गमावलेले सुवर्णपदक मंगळवारी महाराष्ट्राच्या छकुली सेलुकर आणि कल्याणी थिटेच्या पारडय़ात पडले. संघ व्यवस्थापनाच्या पाठपुराव्यामुळे तांत्रिक समितीला या दोघींचे सुवर्णपदक रोखण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. महाराष्ट्राने योगासन प्रकारात सहा सुवर्णपदके मिळविली. कलात्मक योगात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सोनेरी यश संपादन केले. सॉफ्टबॉल प्रकारातही महाराष्ट्राचा पुरुष संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासन प्रकारात महाराष्ट्राची आगेकूच सुरू असतानाच सोमवारी छकुली आणि कल्याणी यांचे सुवर्णपदक रोखून धरण्यात आले होते. तालबद्ध योगा प्रकारातील दुहेरीत सरस कामगिरी करूनही छकुली-कल्याणी जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. संघ व्यवस्थापनाने या निर्णयाला आव्हान दिले. तांत्रिक समितीने पूर्ण पाहणी करून महाराष्ट्राचे आव्हान ग्राह्य धरले आणि सुवर्णपदकाचा निर्णय बदलला.योगासनातच वैभव श्रीरामेने सातत्य कायम ठेवत महाराष्ट्राला कलात्मक प्रकारात सांघिक सुवर्णपदक मिळवून देताना मोलाची कामगिरी बजावली. वैभवसह हर्षल चिटे, मनन कासलीवाल, ओम वरदाई आणि नितीन पवळे यांचा या संघात समावेश होता. त्यांनी १२८ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अवघ्या एका गुणाने त्यांनी हरयाणाला मागे टाकले. योगासनातील महाराष्ट्राचे हे सहावे सुवर्णपदक ठरले.

महिला विभागात छकुली सेलुकर, कल्याणी थिटे, पूर्वा, प्राप्ती किनारे आणि प्रज्ञा गायकवाड यांनी १२८.८ गुणांसह सुवर्णयश मिळविले. त्यांनी गुजरातला मागे टाकले. सॉफ्टबॉल प्रकारात पुरुष संघाने दुसऱ्या पात्रता लढतीत आंध्र प्रदेशचा ८-० असा पराभव केला आणि त्यानंतर अंतिम फेरीत छत्तीसगडचे आव्हान १-० असे परतवून लावत सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत गौरव चौधरीची कामगिरी निर्णायक ठरली. सॉफ्ट टेनिस या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या राहुल उगलमुगले व आयुषा इंगवले जोडीला मिश्र दुहेरीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या लढतीत राहुल उगलमुगले व आयुषा इंगवले जोडीने छत्तीसगडच्या जोडीचा ५-१ असा पराभव केला. मात्र, त्यानंतरच्या लढतीत मध्य प्रदेश संघाने महाराष्ट्राच्या राहुल व आयुषा या जोडीवर ४-२ असा विजय मिळवला. बॉक्सिंग प्रकारात निखिल दुबेने भक्कम बचावाला आक्रमणाची जोड देत ७५ किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठली. निखिलने सेनादलाच्या सजी जॉर्जविरुद्ध पंचांकडून ४-१ असा कौल मिळविला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने