कोल्हापुरात जिल्हाध्यक्षांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; शिंदे गटाकडे वाटचाल

 कोल्हापूर : ‘ आमदार होणारच ‘ अशी गर्जना करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हा  मोठा धक्का आहे. मेव्हण्या – पाहुण्यांच्या राजकारणाची कोंडी फोडायची तरी कशी याचा घोर राष्ट्रवादीच्या प्रदेश, जिल्ह्यातील नेत्यांना लागला आहे. पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी राधानगरी भुदरगड मतदार संघात आधीच या गटाचा आमदार असल्याने ते पुन्हा आमदार कसे होणार यासह अनेक प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थान जवळपास काँग्रेसच्या बरोबरीने भक्कम होते. एकेकाळी जिल्ह्यात दोन खासदार, तीन मंत्री, चार आमदार असे सगळे तगडे स्थान होते. आता जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार आहेत. पक्ष नेतृत्वाची धुरा असलेले माजी ग्रामविकास मंत्र हसन मुश्रीफ यांची सर्वच तालुक्यातील गटातटाची गुंतागुंत सोडवताना कसोटी लागत असते. आताही ए. वाय. पाटील यांनी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. या वादाला मेव्हण्या -पाहुण्यांच्या राजकारणाची जोड आहे.राधानगरी मतदार संघातून यापूर्वी दोनदा बाजी मारलेल्या के. पी. पाटील यांना गेल्या दोन निवडणुकीत  शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी मात दिली. या स्थितीत आगामी निवडणुकीसाठी विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी असा आग्रह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, बिद्री साखर कारखान्याचे संचालक ए. वाय. पाटील यांनी गेल्या १० वर्षांपासून चालवला आहे. पण अद्याप त्यांची डाळ शिजलेली नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भागात झालेल्या कार्यक्रमावेळी के. पी. पाटील यांच्या पराभवाची कारणे माहीत असल्याचे सांगून तालुक्यातील दोन पाटलांचा वाद मिटवणार असल्याचे म्हटले होते. हे प्रकरण तेथेच रेंगाळले आहे. अलीकडे आमदार मुश्रीफ यांनी दोन मेव्हण्या-पाहुण्यांचे राजकारण मिटवताना हात टेकावे लागल्याची हतबलता व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार नसेल तर ती शिंदे गटाकडून  लढवण्याचे मनसुबे ए. वाय. पाटील यांचे आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी ए. वाय. पाटील यांची सलगी वाढल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील यांनी आमदार झाल्याशिवाय थांबणार नाही, असा इरादा बोलून दाखवला. मात्र, त्यांना आमदारकी मिळणार कशी? याचे कुतूहल आहे. या मतदारसंघात आबिटकर हे यावेळी शिंदे गटाचे उमेदवार असणार हे स्पष्ट आहे. याच गटाची उमेदवारी पाटील यांना मिळणार तरी कशी, हा ही प्रश्न आहेच. विधानसभा जिंकायची तर त्यांना राष्ट्रवादी शिवाय पर्याय उरत नाही. आणि तेथे के. पी. पाटील यांच्या उमेदवारी बाबत निर्णय होत नाही तोपर्यंत दुसरे मेहुणे पाटलांना काही करताही येणे शक्य नाही, अशी एकंदरीत गुंतागुंतीची अवस्था आहे.बिद्री कारखान्यावर लक्ष?

ए. वाय. पाटील यांच्या मनात नेमके चालले आहे तरी काय? यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नसेल आणि राष्ट्रवादीकडूनही अडवणूक होणार असेल तर सत्ताकारणासाठी काही भूमिका घेणे त्यांना क्रमप्राप्त ठरले आहे. यातून त्यांची नजर बिद्री साखर कारखान्याकडे वळली असल्याचे सांगितले जाते. या कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील आहेत. कारखान्याची निवडणूक कधीही होवू शकते. या परिस्थितीत कारखान्याचे नेतृत्व अध्यक्षपद आपल्याकडे सोपवावे आणि विधानसभेचे काय ते पाहा , असा पर्याय त्यांच्याकडून येऊ शकतो. यातूनच त्यांची पावले बिद्रीचे नेतृत्व करण्यासाठी  वळली असल्याचे दिसत आहे. मात्र हाही पर्याय बिद्री सक्षमपणे चालवणाऱ्या के. पी. पाटील यांना मान्य होणार का हा प्रश्न आहे. के. पी. पाटील यांचे जावई भोगावतीचे अध्यक्ष असताना तेथे ए. वाय. पाटील यांचा हस्तक्षेप वाढल्याने दोघांमध्ये दुरावा आला होता. आता बिद्रीचे थेट नेतृत्व मागितले तर ते केवळ मेहुणे हट्टासाठी मोलाचे पद सोडतील काय, याचाही गुंता आहेच. राजकारणासाठी दोन्ही पाटलांमधील कटुता कायम राहणार आणि त्यात पुन्हा तिसराच आमदारकी खेचून नेणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने