‘दगडी चाळ’नंतर अकुंश चौधरी ‘ऑटोग्राफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला, एकाचवेळी तीन अभिनेत्रींसह पडद्यावर झळकणार

मुंबई :मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी ‘दगडी चाळ’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नव्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ऑटोग्राफ’ असं त्याच्या नवीन चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ऑटोग्राफ’ चित्रपटात अंकुश तीन अभिनेत्रींसह स्क्रीन शेअर करणार असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांनंतर सतीश पुन्हा एकदा त्यांच्या नव्या कोऱ्या प्रेमकथेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. सतीश राजवाडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी “मनात एक तरी लपवून किंवा जपून ठेवलेली लव्ह स्टोरी असते…! तुमची कोणती आहे?”, असं कॅप्शन दिलं आहे.

‘ऑटोग्राफ’ चित्रपटात अंकुश चौधरीसह अभिनेत्री अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे स्क्रीन शेअर करणार आहेत. येत्या ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी अंकुश सतीश राजवाडे यांच्या ‘ती सध्या काय करते’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने तेजश्री प्रधान आणि उर्मिला कोठारेसह स्क्रीन शेअर केली होते. या चित्रपटाच्या निमित्ताने अकुंश चौधरी आणि अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.‘दगडी चाळ’नंतर अंकुशच्या या नव्या चित्रपटासाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत. सतीश राजवाडे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत चित्रपटासाठी अंकुस आणि टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने