“खोट्या माणसांना तिथून काढण्याची…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर निखिल राजेशिर्केचा संताप.

मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिले एलिमिनेशन पार पडले. दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाईल याबद्दल सर्वजण विविध अंदाज वर्तवत होते. अखेर डॉ. निखिल राजेशिर्के याने बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घेतली. त्यामुळे त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपला. निखिल घराबाहेर पडताच त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहे. मात्र नुकतंच निखिलने त्याच्या वाईल्ड कार्ड इंट्रीबद्दल खुलासा केला आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर महेश मांजरेकरांनी निखिलचे तोंडभरुन कौतुक केले. ‘बाकी काहीही असू दे, घरातला हा बेस्ट माणूस होता’, अशा शब्दात महेश मांजरेकरांनी निखिलचे कौतुक केले. यामुळे अनेकांनी त्याला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून पुन्हा घरात संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. नुकतंच न्यूज १८ लोकमतशी बोलताना त्याने देखील याबद्दल स्वत:ची इच्छा बोलून दाखवली आहे.“मी जर पुन्हा बिग बॉसच्या घरात गेलो तर मला वोट करायला अजिबात विसरु नका. कारण माझा गेम अजूनही ऑन आहे. मी आता जरी बिग बॉसमधून बाहेर पडलो असलो तरी मी तसे समजत नाही. कारण मी अजूनही या स्पर्धेत आहे. येत्या जानेवारीपर्यंत बिग बॉस सुरु राहणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसून सरप्राईज नक्कीच करु शकतो, असे निखिल राजेशिर्के म्हणाला.वाईल्ड कार्ड म्हणून इंट्री घ्यायला मला नक्कीच आवडेल. जर मी वाईल्ड कार्ड म्हणून इंट्री घेतली तर मी असा पहिला स्पर्धक असेल जो वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन हा शो जिंकेल. तिथे जो मनापासून खेळतो तोच बाहेर पडतो, अशा अनेक कमेंट्स मलाही आल्या आहेत. मी खूप चांगलं खेळलो. बिग बॉसमध्ये फक्त भांडणं, गॉसिप करणारे लोक नाही तर खरी माणसंही खेळू शकतात आणि जिंकू शकतात. आज जरी मी बाहेर पडलो असेल तरी तिथे जेव्हा खरंच खऱ्या माणसाची गरज आहे, असे बिग बॉसला वाटेल तेव्हा ते मला परत बोलवतील आणि मी नक्की पुन्हा घरात जाईन. त्यावेळी मी माझा गेम खरेपणाने खेळेन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या खोट्या माणसांना तिथून काढण्याची स्ट्रॅटेजी नक्की वापरेन, असे निखिल राजेशिर्के म्हणाला.

दरम्यान निखिल राजेशिर्केच्या या वक्तव्यानंतर तो पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीला सुरुवात होताच सदस्यांमध्ये होणारे राडे, भांडण, गॉसिप पाहायला मिळाले. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजशिर्के, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, रुचिरा जाधव असे अनेक चर्चेतील कलाकार सहभागी झाले. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने