माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र.

पाकिस्तान:  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं मोठा झटका दिलाय. पाकिस्तान निवडणूक आयोगानं इम्रान खान यांना पुढील 5 वर्षांसाठी अपात्र ठरवलंय.तोषखाना प्रकरणात खोटं विधान केल्याबद्दल इम्रान खान यांना कलम 63 (i)(iii) अंतर्गत अपात्र ठरवण्यात आलंय. पाकिस्तान निवडणूक आयोगाचे आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिलाय. पाच सदस्यीय खंडपीठानं एकमतानं दिलेल्या निकालानुसार, चुकीची घोषणा केल्याबद्दल इम्रान यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू केली जाईल. निवडणूक आयोगानं हा निर्णय जाहीर केल्यानंतर, लगेचच पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी जनतेला त्यांच्या हक्कांसाठी घराबाहेर पडून आंदोलन करण्यास सांगितलंय.

तोषखाना विभाग म्हणजे काय?

पाकिस्तानमध्ये 1974 मध्ये स्थापन झालेला तोषखाना विभाग  हा कॅबिनेट विभागाच्या नियंत्रणाखाली असलेला विभाग आहे. हा विभाग विविध सरकार, राष्ट्रप्रमुख, परदेशी मान्यवरांनी राजकारणी, संसद सदस्य, नोकरशहा आणि पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू गोळा करतो.पाकिस्तानच्या नियमानुसार, विशिष्ट मूल्याच्या भेटवस्तू तोषखान्यात जमा करणं बंधनकारक आहे. तथापि, तोषखाना मूल्यमापन समितीनं ठरविलेल्या मूल्याच्या ठराविक टक्के रक्कम भरल्यानंतर अधिकाऱ्याला या भेटवस्तू ठेवण्याची परवानगी आहे. ज्यांना भेटवस्तू सोबत ठेवायची आहे, त्यांना ठराविक रक्कम भरावी लागते. इम्रान खान यांनी जेव्हा भेटवस्तू सोबत ठेवल्या होत्या, त्यावेळी भेटवस्तूपैकी 20 टक्के रक्कम द्यायची होती. या भेटवस्तू टिकवून ठेवण्यासाठी 50 टक्के रक्कम भरण्याची आवश्यकता असते. मात्र, डिसेंबर 2018 मध्ये नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.काय आहे प्रकरण?

17 ऑक्टोबरला पाकिस्तानमधील एका विशेष न्यायालयानं माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध बंदी घातलेल्या निधीच्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडं खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल दोषी ठरवलं. त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं (एफआयए) गेल्या आठवड्यात 69 वर्षीय खान आणि त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, वूटन क्रिकेट लिमिटेडचे ​​मालक आरिफ मसूद नक्वी यांनी खान यांच्या पक्षाच्या नावानं नोंदणीकृत बँक खात्यात चुकीच्या पद्धतीनं पैसे ट्रान्सफर केले. इम्रानवर पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित माहिती लपवल्याचा आणि तोषखान्यातील काही वस्तू विकल्याचा आरोप होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने