पाडव्याच्या मुहूर्ताला गुळाला ५१०० दर

 कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्यानिमित्त यंदाच्या गळीत हंगामातील पहिले गूळ सौदे काढण्यात आले. मुहूर्ताच्या गुळास प्रतिक्विंटल ३३०० ते ५१०० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीतील वडणगे विकास सेवा संस्था या अडत दुकानात सौदे काढले. बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या हस्ते गुळाचे सौदे काढण्यात आले. पाडव्या दिवशी १९ हजार २८० गूळ रव्याची आवक झाली. यापैकी काही गुळालाच पाच हजारांपर्यंत दर मिळाला आहे, तर इतर गुळाला मात्र तीन हजार रुपयांदरम्यानच दर मिळाला आहे.यंदा उसाची उपलब्धता चांगली होणार असल्याने गुळाची आवक ही वाढण्याची शक्यता आहे. बाजार समितीतील सर्वच घटकांनी यंदाचा हंगाम सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जगताप यांनी केले. प्रशासक मंडळाचे सदस्य बाजीराव जाधव, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, के. बी. पाटील आदींसह गूळ उत्पादक व बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गूळ प्रकार - दर प्रति क्विंटल स्पेशल 
एक नंबर प्रत - ४५०० ते ५१०० 
दोन नंबर प्रत - ४२०० ते ४४९०
तीन नंबर प्रत - ३९५० ते  ४१९०
चार नंबर प्रत - ३६०० ते ३९४०
पाच नंबर प्रत - ३२०० ते ३५९०

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने