नोकरदारांना २०२३ मध्ये ‘अच्छे दिन’, जगातील सर्वाधिक पगारवाढ भारतात; पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट होणार

मुंबई: महागाईने सर्वसामान्य त्रस्त असतानाच आगामी वर्षात नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये भारतात जगातील सर्वाधिक पगारवाढ होणार आहे, असे ‘वर्कफोर्स कन्सल्टन्सी ईसीए इंटरनॅशनल’ या संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतात ४.६ टक्क्यांनी ही पगारवाढ अपेक्षित असल्याचे या सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे. भारतानंतर व्हिएतनाममध्ये ४ टक्क्यांनी तर चीनमध्ये ३.८ टक्क्यांनी पगारवाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अत्यंत कमी पगारवाढ होणाऱ्या पाच देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये वेतनवाढीचा दर -९.९ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सर्वाधिक पगारवाढ होणाऱ्या टॉप १० देशांच्या यादीत आशिया खंडातील आठ देशांचा समावेश आहे. वाढत्या महागाईमुळे जगभरात पगारवाढीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर केवळ ३७ टक्के देशांमध्ये वेतनवाढ अपेक्षित आहे. वेतनाच्या बाबतीत सर्वाधिक फटका युरोपीय देशांना बसला आहे. या देशांमध्ये अत्यंत कमी वेतनवाढ होण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.इंग्लंडमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सरासरी ३.५ टक्के वाढ होऊनही महागाईचा दर ९.१ टक्क्यांनी वाढल्याने खऱ्या अर्थाने वेतन ५.६ टक्क्यांनी घसरले आहे. या सर्वेक्षणानुसार पुढील वर्षी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्याही पगारवाढीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने