हिंगोली; ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आमदार संतोष बांगर यांच्यासह शिवसैनिकांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडले

 हिंगोली: शेतकऱ्यांचा भरलेला विमा नाकारल्याच्या कारणावरून संताप व्यक्त करत बाळासाहेबांची शिवसेनाचे आमदार संतोष बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयात गुरुवारी दुपारी तोडफोड केली. नंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याचे सांगत हा प्रकार कदापीही खपून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मुदतीनंतर काही तक्रारी आल्या. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे सांगत विमा कंपनीने नुकसानीच्या तक्रारी फेटाळून लावल्या. सुमारे ३० हजारपेक्षा अधिक तक्रारी फेटाळून लावल्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते. या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे विमा कंपनीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आमदार बांगर यांनी हिंगोलीतील पिकविमा कार्यालयातआपल्या सहकाऱ्यांसह जाऊन फोडतोड केली.विशेष म्हणजे औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा मुद्दा जिल्हाभर गाजत आहे. विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक शेतकरी अर्जावर आपली स्वाक्षरीच नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विमा कंपनीची बनवाबनवी उघड झाली, अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.खऱ्या अर्थाने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा मिळेल या आशेवर वेळेत रकमा भरल्या. परंतु शेतावर न जाता परस्पर सर्वे करून अर्जावर बनावट स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा. तसेच विम्याची रक्कम भरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने