विकी कौशलच्या चित्रपटातून सारा अली खानला बाहेरचा रस्ता, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी

मुंबई: भिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सैफ अली खानची लाडकी मुलगी अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. सोशल मीडिया पोस्ट आणि आगामी चित्रपटांमुळे सारा अली खान अनेकदा चर्चेत असते. पण आता साराच्या एका आगामी चित्रपटाबाबत अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे तिचे चाहते निराश होऊ शकतात. सारा अली खान अभिनेता विकी कौशलसह आगामी चित्रपटात दिसणार होती मात्र या चित्रपटात साराला रिप्लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तिच्या जागी दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी लागल्याचं बोललं जात आहे.सारा अली खान आणि विकी कौशल ‘इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात एकत्र काम करणार होते. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. दरम्यानच्या काळात चित्रपटाचं शूटिंग लांबल्याने चित्रपट बंद करण्यात आला असं बोललं जात होतं. पण, आता पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार होती. पण, आता तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्कीपेक्षा वयाने मोठी दिसणारी अभिनेत्री या चित्रपटात कास्ट करण्यात येणं अपेक्षित आहे.

रिपोर्ट्सनुसार आता चित्रपटात बरेच बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या आधीच्या स्क्रिप्टनुसार, तरुण स्त्री पात्र चित्रपटात दाखवायचं होतं, त्यामुळे या भूमिकेसाठी साराला साइन करण्यात आले. पण, आता कथेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एका अशा अभिनेत्रीला चित्रपटात घ्यायचं आहे, जी चित्रपटाचा मुख्य अभिनेता विकी कौशलपेक्षा वयाने मोठी दिसेल. रिपोर्ट्सनुसार, मेकर्सनी प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री बदलली असली तरी विकी कौशल अजूनही चित्रपटाचा एक भाग आहे. त्याच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आदित्य धर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाची कथा ही आजच्या काळाच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. विकीची पकड मजबूत आहे आणि प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ कायम आहे. त्यामुळे त्याला रिप्लेस करण्यात आलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे कामही सुरू झाले आहे. या चित्रपटाची कथा महाभारतातील अश्वत्थामा या व्यक्तिरेखेवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने