गडचिरोलीच्या सिंरोचा तालुक्याला भूकंपाचे धक्के; ३.८ रिश्टर स्केल तीव्रता

 गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिरोंचा तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे हादरे बसले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरात होते. मात्र, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे माहिती प्राप्त झालेली नाही. धरणक्षेत्रात भूकंपाचा धोका अधिक असतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर बांधण्यात आलेले धरण या भूकंपाला कारणीभूत आहे काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. काही वर्षांपूर्वीदेखील या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते, हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने