संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंचा टोला.

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर झालेल्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं. संजय राऊतांनी मात्र यावरुन हे सगळं स्क्रिप्टेड आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुनच आता शहाजी बापू पाटलांनी त्यांना टोला लगावला आहे.माध्यमांशी संवाद साधताना सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांना नारदमुनी असं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाचं आणि उमेदवार मागे घेण्याच्या भाजपाच्या निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं आहे. शहाजीबापू म्हणाले, "भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून राज्याची संस्कृती पुढे येताना दिसते. राज ठाकरेंच्या पत्राची दखल फडणवीस यांनी तात्काळ घेतली आणि पुढची कार्यवाही केली आहे. पण संजय राऊत हे नारदमुनीचं पात्र आहे. तुरुंगातूनही काडी पेटवत आहेत."

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. त्यासाठी त्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी भाजपाला उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. हे आवाहन स्क्रिप्टेड असल्याचं संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर शहाजी पाटलांनी ही टीका केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने