“त्याला काय अधिकार आहे…?”; शिल्पा शिंदेचे करण जोहरवर टीकास्त्र, ‘झलक दिखला जा’च्या परीक्षणावर घेतला आक्षेप

मुंबई: भाभी जी घर पर है’ या मालिकेतील ‘अंगूरी भाभी’ ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे काही दिवसांपूर्वी ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून झळकली. तेथून बाहेर पडल्यावर या कार्यक्रमाच्या परीक्षकांबाबत तिने नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाच्या या पर्वात अनेक नावाजलेले कलाकात स्पर्धक म्हणून सहभागी होऊन त्यांचे नृत्य कौशल्य दाखवत आहेत. ‘झलक दिखला जा’च्या या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. परंतु थोड्याच दिवसात ती एलिमिनेट झाली. आता मात्र तिने या कार्यक्रमातील परीक्षकांवर आणि त्यांच्या अपेक्षांवर टीका केली आहे. खास करून तिने करण जोहरवर निशाणा साधला आहे. करणला अजिबात नाचता येत नाही असे तिने म्हटले आहे. तसेच नोराच्या इंग्रजी बोलण्यावरही तिने आक्षेप घेतला आहे.नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओत ती ‘झलक दिखला जा’च्या परीक्षकांवर चिडलेली दिसत आहे. ती म्हणाली, “हा व्हिडिओ खास ‘झलक दिखला जा’च्या परीक्षकांसाठी आहे. मी नियाचा शेवटचा परफॉर्मन्स पाहिला. त्यावर त्यांनी केलेल्या कमेंट्स मी गप्प बसून ऐकल्या. पण यावेळी तिच्या परफॉर्मन्सनंतर ज्या कमेंट्स आल्या, त्यावरून मला विचारायचे आहे की करण सर तुम्ही नियाला धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट देणार आहेत का? तुम्हाला त्या 3 मिनिटांच्या सादरीकरणात डान्स दिसला नाही? तुम्हाला काहीतरी वेगळे हवे आहे. हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. तुम्ही सेलिब्रिटी स्पर्धकांना घेता. तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही त्यांना ऑस्कर देणार आहात का? की राष्ट्रीय पुरस्कार देणार आहात?”

पुढे ती म्हणाली, “त्या ३ मिनिटांच्या सादरीकारणासाठी कलाकार काय करतो हे तुम्हाला माहीत आहे का? ही स्पर्धा नाही असे तुम्हीच म्हणता पण तरीही स्पर्धा असल्यासारखे वागता. रुबिना दिलैकचा व्हिडीओ बघा. कोणतीही दुर्घटना घडू शकली असती. त्याचा काहीही परिणाम होऊ शकला असता. त्यानंतर याला जबाबदार परीक्षक असणार आहेत का? दुर्घटना घडल्यानंतर मेणबत्ती घेऊन रस्त्यावर जाण्यात काहीही अर्थ नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत तिचा आदर करा.”आणखीन एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, “करण सरांना डान्स अजिबात येत नाही. त्यामुळे करण सरांना कमेंट करायचीच असेल तर ती त्यांचा अभ्यास ज्या गोष्टीचा आहे त्यावर करावी. पोशाख, मेकअप, सेटअप… करण सर तुम्ही डान्स वर कसे बोलू शकता? माधुरी मॅमना नृत्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. नोरा मॅम, थोडं हिंदी शिकून आलात तर बरं होईल. तुम्ही हिंदी कार्यक्रमाचे परीक्षण करत आहात, तर तुम्हाला हिंदी बोलता आलं पाहिजे.” शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनला असून नेटकरी यावर कमेंट्स करत तिला सहमती दर्शवत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने