शशी थरुर यांना सुकाणू समितीत स्थान नाही; पृथ्वीराज चव्हाण, भुपिंदर सिंह हुड्डांनाही वगळलं

दिल्ली:  नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी ४७ सदस्यांची सुकाणू समिती स्थापन केली आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारणीची स्थापना होईपर्यंत ही समिती पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. खरगेंनी स्थापन केलेल्या सुकाणू समितीतून ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी शशी थरुर यांना वगळण्यात आलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर थरुर यांची पक्षातील महत्त्वाच्या पदावर वर्णी लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर थरुर यांनी खरगेंच्या नेतृत्वाखाली पक्ष हितासाठी काम करण्याची तयारीही दर्शवली होती.थिरुवनंतपुरमचे लोकसभा खासदार असलेले थरुर काँग्रेसच्या जी-२३ गटाचे सदस्य आहेत. या गटातील सदस्यांनी पक्षाचा काही भूमिकांवर टीका करत बदलांची मागणी केली होती. या गटातील केवळ आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक यांना सुकाणू समितीत स्थान देण्यात आले आहे. या दोघांनीही खरगे यांच्या उमेदवारीसाठी नामनिर्देशक म्हणून स्वाक्षरी केली होती. जी-२३ गटाचे सदस्य आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंह हुड्डा यांनाही या समितीतून वगळण्यात आलं आहे. हरियाणामध्ये हुड्डा यांचा मोठा प्रभाव आहे. राज्य पातळीवरील संघटनात्मक बांधणीतही त्यांचं वर्चस्व आहे. हुड्डा यांचे पुत्र दिपेंदर खरगेंच्या प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते.

या समितीतून ज्येष्ठ काँग्रेस नेते मनीष तिवारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनादेखील वगळण्यात आलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत खरगे यांना पाठिंबा दर्शवला होता. बुधवारी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी खरगे यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले होते. या समितीची पक्षाकडून लवकरच नव्याने स्थापना करण्यात येणार आहे. जी-२३ गटातील सदस्यांना या समितीत स्थान मिळणार की सुकाणू समितीप्रमाणे डच्चू देण्यात येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांना ७,८९७ तर थरूर यांना १,०७२ मते मिळाली होती. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते समजले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने