बालिकेने गिळलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली

कोल्हापूर : पन्हाळ्यातील सात वर्षीय बालिकेने गिळलेली पिन अन्ननलिकेत अडकली होती. सीपीआर रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही पिन काढण्यात यश मिळवले. त्यामुळे या बालिकेच्या जीवाचा धोका टळला.

चार दिवसांपूर्वी बालिकेला गिळताना त्रास होत असल्याने तिच्या आई-वडिलांनी बालिकेला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले. कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी लक्षणे समजून तातडीने घसा व मानेचे एक्स-रे काढले. या बालिकेच्या अन्ननलिकेत केसात घालण्याची पिन अडकली असल्याचे दिसले. त्यानंतर विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे व डॉ. वासंती पाटील यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया करून पिन काढली.


ही पिन. १.५ सेंटिमीटर आकाराची होती. पिन दोन दिवस अन्ननलिकेत असल्याने अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा धोका होता; मात्र वेळीच अचूक निदान झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करून ही पिन बाहेर काढली. पुढील उपचारानंतर बालिकेची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे बालिकेच्या प्रकृतीला असलेला धोका कमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित व अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने