विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक समोर आला होता. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा आणखीन वाढवण्यासाठी या चित्रपटाच्या टीमने ‘व्हिक्टोरिया’चे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे.विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर या आगामी चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी दिसत असून एक स्त्री दिसत आहे. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत रागीट आहेत. हे पोस्टर शेअर करताना विराजसने लिहिले, “जीत अशोक आणि मी दिग्दर्शित केलेला मराठी हॉरर सस्पेन्स चित्रपट… ‘व्हिक्टोरिया’! ती येत आहे…१६ डिसेंबरपासून सिनेमागृहात…”

विराजसने आतापर्यंत अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पण दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग तसेच आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विराजसच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तसेच अनेक कलाकार मित्रांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला होता. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने