शिंदे-फडणवीस सरकार येत्या पाच ते सहा महिन्यांत कोसळेल ; सुषमा अंधारे

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीत आयारामांना स्थान तर निष्ठावंताना बाजूला केले जात आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने जाणीवपूर्वक बाजूला केले, असे अनेक नेते पक्षात दुखावले आहेत, असा आरोप करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येत्या पाच ते सहा महिन्यांत कोसळेल, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला. महाप्रबोधन यात्रेसाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


श्रीमती अंधारे म्हणाल्या, ‘‘ज्या सरकारातील आमदारांना पालकमंत्री विश्‍वासात घेत नसतील, त्यांना किंमत देत नसतील, त्यांना जाणीवपूर्वक पक्षपात करत असतील, तर सरकारात धुसफूस होणे साहजिक आहे. आमदार सुहास कांदे यांनी अलीकडेच पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील रवी राणा हे बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोक्यांप्रकरणी केस दाखल करायची झाल्यास प्रथम राणांवर करावी लागेल.’’त्या म्हणाल्या, ‘‘श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप अतिक्रमण करत आहे. प्रताप सरनाईकांचा मतदारसंघ भाजप मागत असून, त्यांच्यावर ईडीची टाच आणली जाते. हे प्रेशर पॉलिटिक्स सहनशक्तीपलीकडचे आहे. आढळराव-पाटील, अर्जुन खोतकर यांचे मतदारसंघही भाजप मागत आहे. हे एकनाथ शिंदे गटाला संपविणारे चित्र आहे.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने