अफजलखानाचे उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला पाहिजे, मनसे नेत्याचं खळबळजनक विधान

सातारा:  साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. चोख पोलीस बंदोबस्तात आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहे. दरम्यान मनसे नेते गजानन काळे यांनी या कारवाईवर बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. अफजलखानाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.“क्रूरकर्मा अफजलखान याच्या कबरीसमोरचं अतीक्रमण हटवलं याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आहे. अफजलखानाच्या कबरीसमोर उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे, त्याप्रमाणे त्याचं उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला पाहिजे. अफजलखानाच्या विचारधारेचं अतिक्रमण हटेल तोच सुदिन असेल,” असं गजानन काळे म्हणाले आहेत.“या कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

अफजलखानाच्या कबरीशेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली.अफजलखानाच्या कबरीशेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात येत होतं. तेथे उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती. तेथील उदात्तीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली होती. या परिसरात जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली होती. आज पहाटे तारखेप्रमाणे आलेल्या शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने