कोल्हापूरकरांचा नाद खुळा! जन्माला आला मुलगा अन् पाचवीला पुजला 'फुटबॉल'

 कोल्हापूर : महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये फुटबॉलप्रेमी जास्त आहेत. कोल्हापूरकरांना फुटबॉलचं जणू वेडंच लागलंय. कारण एका कोल्हापूरकर पठ्ठ्याने आपल्या मुलाच्या पाचवीला चक्क फुटबॉल पुजलाय. कोल्हापूरातील आझाद चौक, देवकर पाणंद येथील एकाने आपल्या मुलाच्या पाचवीला चक्क फुटबॉल खेळाचा देखावा साजरा केलाय.

कोल्हापूर येथील अजय जगदाळे यांनी हा पराक्रम केला असून त्यांना १४ नोव्हेंबर रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी पाचवीची पूजा केली जाते. त्यांच्या मुलाची पाचवीची पूजा करण्याची लगबग सुरू होती. पण त्यांनी या पूजेच्या वेळी आख्खा फुटबॉलचा देखावाच उभारला. त्यामध्ये त्यांनी फुटबॉल, या खेळातील दिग्गज खेळाडूंचे टी-शर्ट, दिग्गज खेळाडूंचे फोटो अशा वस्तूंनी देखावा सजवला होता. तर यासंदर्भातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, अजय जगदाळे हे खासगी नोकरी करत असून त्यांच्या मनात फुटबॉल या खेळाबद्दल चांगली आस्था आहे. तर कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील संध्यामठ तरूण मंडळ या नावाजलेल्या फुटबॉल संघाचे ते कार्यकर्ते आहेत. तर सध्या कोल्हापूरमध्ये त्यांनी पाचवीला पूजलेल्या फुटबॉलची चर्चा आहे.सध्या कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक सुरू आहे तर कोल्हापूरमध्ये फुटबॉलचं वेगळंच वेड लागलंय अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने