“गजानन किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात…”, संजय राऊतांचं टीकास्र; स्वत:चं दिलं उदाहरण!

मुंबईः गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गजानन किर्तीकर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. त्याचवेळी त्यांनी स्वत:चं उदाहरणही दिलं आहे.

ठाकरेंवर टीका, किर्तीकरांचा शिंदेगटात प्रवेश

गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही”, असं किर्तीकर म्हणाले. गजानन किर्तीकरांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र अजूनही उद्धव ठाकरेंच्याच पाठिशी आहेत.संजय राऊत म्हणतात, “सर्वकाही भोगलेले…”

संजय राऊतांनी गजानन किर्तीकरांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत.पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील”, असं संजय राऊत म्हणाले.” तुम्ही गेलात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण हा पक्षाला कोणताही धक्का नाही. १८ पैकी १३ तिकडे गेले असले, तरी काय झालं? त्यांना पुन्हा निवडूनही यायचं आहे ना? त्यांच्यापैकी किती निवडून येतात बघून घेऊ ना”, असंही राऊत म्हणाले.

“अमोलनं वडिलांना समजवायचा प्रयत्न केला”

दरम्यान, अमोल किर्तीकर यांनी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, असं संजय राऊत म्हणाले. “अमोल किर्तीकरने त्याच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. अमोल किर्तीकर आजही शिवसेनेसोबत आहे आणि राहील”, असं ते म्हणाले.गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेत आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “न्यायाची व्याख्या काय आहे? मला तर जेलमध्ये टाकलं, तरी मी पक्षासोबत आहे. संकटात जो पक्षासोबत, आपल्या कुटुंबासोबत राहतो, त्याला निष्ठा म्हणतात”,असं राऊत यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने