शिंदे गटातले आमदार बेताल; भाजपा नाराज? CM शिंदे स्वतः कान टोचणार?

मुंबई - राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सत्तार यांना महिला आयोगाची नोटीस देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरावर दगडफेकही केली. सत्तारांच्या याच विधानानंतर आता एकनाथ शिंदे स्वतः या विषयात लक्ष घालणार आहेत.राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासूनच शिंदे गटातल्या आमदारांच्या बेताल वक्तव्यांना उत आला आहे. अनेकदा त्यांच्याकडून वादग्रस्त विधानं केली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. नुकतंच अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. सातत्याने होणाऱ्या अशा वादांमुळे भाजपाही शिंदे गटावर नाराज असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचं एक दिवसीय शिबीर होणार आहे. या शिबिरामध्ये अशाच वादग्रस्त वक्तव्यांबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे स्वतः आपल्या गटातल्या आमदार आणि मंत्र्यांचे कान टोचणार आहे. फक्त सत्तारच नव्हे तर संतोष बांगर, गुलाबराव पाटील हे नेतेसुद्धा आपल्या बेताल वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये वादात सापडले आहेत. हे प्रकरण आता एकनाथ शिंदेंनी अधिक गंभीरपणे घेतलं असल्याचं दिसून येत आहे.अब्दुल सत्तार यांनी हे विधान करताच काही वेळातच एकनाथ शिंदेंनी एक तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सत्तार यांची कानउघडणी करत त्यांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्यास सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने