अजित पवार यांचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, म्हणाले ‘…हीच खरी आदरांजली ठरेल’

मुंबई : शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत राज्यात सरकारची स्थापना केलेली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले आहे. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनीदेखील ट्विटद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.अजित पवार यांनी ‘शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या, हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल,’ असे म्हणत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील एक जुना फोटो शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. ‘ हे नाते खूप जुने आहे. साहेब.. विनम्र अभिवादन’ असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत. या बंडानंतर ठाकरे-शिंदे गटांत टोकाचे वाद होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी हाच वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ नोव्हेंबरच्या रात्रीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. मात्र शिंदे यांचा ताफा स्मृतीस्थळावरून निघून जाताच ठाकरे गटातील नेत्यांनी स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडले आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत हेदेखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने