संजय राऊतांची सुटका झाल्याबद्दल विचारताच अजित पवार संतापले, म्हणाले “मी तुम्हाला आधीच…”

पुणे: पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत जामीन मिळाल्यानंतर जेलबाहेर आले आहेत. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असून पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. न्यायालयानेही संजय राऊतांची अटक बेकायदा असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या सुटकेबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्याबद्दल चुकीचं वृत्त दिल्याबद्दल नाराजीही जाहीर केली.

संजय राऊत जेलबाहेर आल्याचं विचारताच अजित पवार म्हणाले, मला याबद्दल काही माहिती नाही. मी बाहेरगावी गेलो होतो. ४ तारखेला रात्री उशिरा गेलो आणि १० तारखेला परत आलो. पण त्याबद्दल काही माहिती न घेता बातम्या चालवण्यात आल्या. कोणीतरी माझ्या ऑफिसमध्ये फोन करुन अजित पवार कुठे गेलेत विचारायला हवं होतं. मी यासंबंधी वेगळी पत्रकार परिषद घेईन.“कारण नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, उगाच माझी प्रतिमा मलीन केली. मी पळून जाणारा माणूस नाही, मी कोणत्याही गोष्टीला सामोरा जाणार माणूस आहे,” असंही ते म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विधानावर बोलण्यासही नकार दिला. आपण मुंबईत स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.अजित पवारांनी यावेळी ‘भारत जोडो’ यात्रेवरही भाष्य केलं. “भारत जोडो यात्रेला पहिल्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा संपल्यानंतर हे वातावरण टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेकदा चांगल्या पद्दतीने गोष्टी होतात आणि दोन महिन्यात लोक विसरुन जातात. असं होता कामा नये,” असं अजित पवारांनी सांगितलं.ओला दुष्काळ जाहीर न कऱण्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा असं सरकारला सागितलं होतं. पण दोघांनीही ते अजून केलं नाही. खरीपसह रब्बीचंही नुकसान झालं. विम्याचे पैसेही मिळत नाहीत. त्याचे मोठे आकडे पाहायला मिळतात, पण तुटपुंजी रक्कम देतात. त्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने