“लढतीचा…” कडू विरुद्ध राणा वादावरून अनिल परब यांचा टोला; म्हणाले, “फोडणी कोण घालत आहे”

मुंबई: आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. ‘धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारू’ असा इशारा रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे. त्यानंतर ‘कोणत्या चौकात थांबू’, असे प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी रवी राणांना दिलं आहे. यावर शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार अनिल परब यांनी ‘लढतीचा आनंद’ घेत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज ( ३ नोव्हेंबर ) मतदान पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू आणि रवी राणांच्या वादावर विचारण्यात आले असता, “या प्रकरणावर आम्ही बोलणं उचीत होणार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असून, दोघे एकमेकांना बघून घेतील. दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे, आम्ही प्रेक्षक आहोत. लढतीचा आनंद आम्ही घेत आहे. या वादाला फोडणी कोण घालत आहे, हे तपासण्याची गरज आहे,” अशी शंकाही परब यांनी उपस्थित केली.

“पोलीस कोणाच्या दबावाखाली काम आहेत”

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विरोधकांकडून नोटाला मतदारन करण्याचं आवाहन केलं आहे. यावर परब म्हणाले, “नोटा साठी ‘नोटां’चा वापर केल्याच्या बातम्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आम्ही हे समोर आणलं होतं. याबाबत पोलीस उपायुक्तांना १० व्हिडीओ आणि फोटो पाठवले आहेत. निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु, कोणतेही कारवाई झाली नाही. काही लोकांना पकडलं, अशी चर्चा आहे. मात्र, पोलीस कोणाच्या दबावाखाली काम आहेत, माहिती नाही.”

“शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ चिन्ह…”

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘मशाल चिन्हा’विरोधात समता पक्षाची याचिका दुसऱ्यांदा फेटाळली आहे. यावरही अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोगाने विचार करुन शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ चिन्ह दिलं होतं. आम्हाला तीन पर्याय दिले होते, त्यातील ‘धगधगती मशाल’ चिन्ह आम्ही घेतलं आहे,” असेही परब यांनी स्पष्ट केलं.

“जाहिराती रोख पैशात देत असतील तर…”

‘सामना’त महाराष्ट्र सरकारची जाहिरात छापण्यात आली आहे. त्यावरून खोके ‘सामना’च्या कार्यालयात पोहचले का?, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. यावर “सरकारने काय रोखीत पैसे दिले का?, बाकींच्यांना रोख पैशात खोके पोहचले आहेत. जाहिराती रोख पैशात देत असतील तर गंभीर प्रश्न आहे,” असेही अनिल परब यांनी म्हटलं.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने