विधु विनोद चोप्रा यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा; ‘या’ २ प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्यांवर बेतलेली असेल कथा

मुंबई : ७० वर्षांचे निर्माते विधु विनोद चोप्रा आजही तितक्याच आत्मियतेने मनोरंजनसृष्टीत काम करतात. कित्येक सुपरहीट चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे विधु विनोद चोप्रा यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विधु विनोद हे आता ‘१२ वी फेल’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या लोकप्रिय कादंबरीवरुन प्रेरित असल्याचं स्पष्ट झालं आहे.हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर बेतलेला आहे, पण ‘१२वी फेल’ हा बायोपिक नक्की नाही. खऱ्या घटनांपासून प्रेरित असलेला हा एक व्यावसायिक चित्रपट असणार आहे. शिवाय ‘१२वी फेल’ हा पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण नवी दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात झाले आहे. या परिसरात कित्येक नोकरशहांच्या पिढ्यान पिढ्या जन्मल्या आहेत.चित्रपटाबद्दल बोलताना विधु विनोद चोप्रा म्हणाले, “जर प्रामाणिक व्यक्ती मोठ्या पदावर असेल तर तो खरोखर बदल घडवू शकतो. या चित्रपटाची कथा लिहिताना मी बऱ्याच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलो. जर या चित्रपटातून १० अधिकाऱ्यांना किंवा १० विद्यार्थ्यांनाही प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली तर माझा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन.”विधु विनोद चोप्रा यांच्या या चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘१२वी फेल’चे पहिले शेड्यूल चंबळमध्ये पूर्ण झाले असून याचे पुढचे चित्रीकरण दिल्लीत सुरू आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधु विनोद चोप्रा यांच्या ‘शिकारा’ या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने