"नवे उद्योग राज्यात येतायत; केंद्र सरकार प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी देत आहे"

मुंबई : राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातल्या रोजगार मेळ्याला सुरुवात केली. ७५ वर्षे ७५ हजार नोकऱ्या आम्ही देऊ अशी घोषणाही राज्य सरकारने केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आपल्या राज्याच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा आहे. सातत्याने मेसेज यायचे की भरती कधी होणार, नियुक्त्या कधी होणार. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दिवस आहे. ७५ वर्षे ७५ हजार नोकऱ्या आम्ही देऊ अशी घोषणा आपल्या सरकारने केली आहे. वर्षभरात या नोकऱ्या द्यायच्या आहेत, हा पहिला टप्पा आहे. महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे ज्याने रोजगार द्यायला सुरुवात केली. राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे".महाराष्ट्राला दिलेले प्रकल्प भाषणातून मांडले आहेत. मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र सरकारने विकासासाठी दिलेला आहे. आम्ही मागे केंद्राला युडीचा 14 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी हा निधीही मंजूर केला आहे. राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम हे सरकार करत आहे. हा पहिला टप्पा आहे, यात दोन हजारपेक्षा जास्त नियुक्त्या केल्या जात आहेत. पोलीस खात्यातही १८ ते २० हजार नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. प्रत्येक विभागात रिक्त पदं भरण्यात येत आहेत. MPSC च्या बळकटीकरणासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

शिंदे पुढे म्हणाले, "आपल्या सरकारबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मागची अडीच वर्षे काहीच नव्हतं. आपलं सरकार आलं आणि उत्साह, चैतन्य आलं. काही जण म्हणतात फक्त सण साजरे करतायत. अरे पण लोकांना ते हवं आहे. आलं की नाही चैतन्य बघा! आम्ही निर्णय घेतला, आत्तापर्यंत घेतला होता का? सुरुवातीला आम्ही दोघेच होतो, धडाधड निर्णय घेतले. मग म्हणाले दोघेच निर्णय घेतायत, मंत्रिमंडळ करा. मग मंत्रिमंडळ केलं आता अजून मंत्रिमंडळ होणार आहे. तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हे गतिमान सरकार आहे. वातावरण आणि लोकांचा दृष्टिकोन बदलायला हवा, अशी चर्चा आम्ही अधिकाऱ्यांशी केली. नोकरभरतीसाठी काम केलेल्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद. आता बदल झाला आहे, लोकांच्या जीवनात तो आला पाहिजे, जीवनमान उंचावलं पाहिजे, म्हणूनच आम्ही मोठमोठे निर्णय घेत आहोत."राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "उद्योग का गेले कसे गेले कोणामुळे गेले हे आता सांगत नाही. पण नव्याने उद्योग येत आहेत. हे काम करणारे सरकार आहे. लोकाभिमुख सरकार आहे. कोणाचा पर्सनल अजेंडा नाहीय. केंद्र देखील आपल्या प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने