विजय रुपाणींचा सुद्धा पत्ता कट, आपमुळे गुजरात भाजप हादरलंय ?

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या १ आणि ५ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, निवडणुकीआधीच भाजपच्या गोटात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यास नकार दिला आहे. यातील प्रमुख नाव म्हणजे विजय रुपाणी. गुजरातचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विजय रुपाणी यांनी अचानक निवडणुकीत माघार घेतल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच, आपचा गुजरातमधील वाढता प्रभाव हा देखील भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे समोर येत आहे.गेल्या काही वर्षात गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. याचे कारण म्हणजे गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची गृहमंत्री अमित शाह यांचे होमटर्फ आहे. देशातील कोणत्याही भागात अगदी महानगरपालिकाच्या निवडणुका असो अथवा विधानसभेच्या; भाजपकडून गुजरात मॉडेलचे उदाहरण नेहमीच दिले जाते. त्यामुळे गुजरातमध्ये विजय मिळवणे हे एकमेव लक्ष्य मोदी आणि भाजपसमोर आहे. गुजरातमधील निवडणुकींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिले जाते. अशावेळी, राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांचे तिकीट कापल्याने भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.भाजपच्या प्रमुख नेत्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

गुजरातमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. यातील प्रमुख नाव हे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे आहे. यासोबतच, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र सिंह चुडासमा यांचा समावेश आहे. रुपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले सौरभ पटेल, प्रदीपसिंह जडेजा, विभावरी दावे, वल्लभ काकडिया आणि आर सी फलदू यांनीही यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे. रुपाणी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहित निवडणूक लढवणार नसल्याचे कळवले आहे. यासोबतच, त्यांनी तरूणांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.

रुपाणी आणि पटेल यांचे राजकारण संपले?

वर्षभरापूर्वीच गुजरातमधील संपूर्ण सरकार बदलण्यात आले होते. विजय रुपाणी आणि नितीन पटेल हे जवळपास ३ दशकांपासून राज्यातील राजकारणात सक्रीय आहेत. अगदी नगरसेवकापासून ते आमदारकीपर्यंत अनेक पदे या नेत्यांनी पदे भुषवली आहेत. परंतु, आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे, वरिष्ठ नेत्यांचे तिकीट कापत भाजपकडून लोकांमध्ये सरकारविरोधी असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विजय रुपाणी यांचा कार्यकाळ

भाजपकडून विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयोग अनेक राज्यात केला जात आहे. कर्नाटक, उत्तराखंड आणि आसाममध्ये असे प्रयोग त्यांनी केले आहेत. वर्ष २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले होते. ते २०१४ ला राजकोट पश्चिम येथून पोटनिवडणुकीत विजय मिळवत आमदार झाले होते. आमदार झाल्यानंतर २ वर्षातच ते मुख्यमंत्री झाले होते. २०१७ मध्ये देखील त्यांनी याच जागेवरून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. भाजप २०२२ ची विधानसभा निवडणूक रुपाणी यांच्या नेतृत्वातच लढवणार असे वाटत असतानाच १५ महिन्यांपूर्वी भूपेंद्र पटेल यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले होते. रुपाणी यांना पदावरून हटवण्याचे प्रमुख कारण म्हणजे ते आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात स्वतःची विशेष छाप पाडू शकले नाहीत. याशिवाय, बेरोजगारी व महागाई सारखे मुद्दे हाताळण्यात देखील त्यांना अपयश आल्याचे सांगितले जाते. रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपला केवळ ९९ जागांवर विजय मिळवण्यात यश आले होते.

पाटीदार फॅक्टर महत्त्वाचा

गुजरात निवडणुकांमध्ये पाटीदार फॅक्टर हा महत्त्वाचा मानला जातो. गुजरातमध्ये पाटीदार समाजाची लोकसंख्या जवळपास १५ टक्के आहे. राज्यातील १८२ पैकी ७० टक्के जागांवर याचा परिणाम होतो. पाटीदार समाजानंतर ओबीसी आणि दलित-आदिवासी मतदारांची संख्या जास्त आहे. अशात विजय रुपाणी हे जैन समुदायातून येतात. रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांच्याकडे सत्ता सोपवत भाजपने पुन्हा पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

नरेंद्र मोदी हाच एकमेव चेहरा

गेल्या २७ वर्षापासून गुजरातची सत्ता एकहाती भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा सत्ता कायम ठेवणे गरजेचे आहे. देशात कोठेही निवडणुका असल्या तरीही पंतप्रधान मोदी हेच भाजपचे चेहरा असतात. गुजरातने गेल्याकाही वर्षात आनंदीबेन पटेल, विजय रुपाणी आणि भूपेंद्र पटेल असे अनेक मुख्यमंत्री पाहिले आहेत. परंतु, गुजरातच्या मतदारांसाठी नरेंद्र मोदी हे एकमेव महत्त्वाचे फॅक्टर आहेत. इतर नेते हे नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याच छायेखाली वावरत असल्याचे पाहायला मिळते.

भाजपची धकधक वाढली

गुजरात विधानसभा निवडणुकांकडे २०२४ ची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. तसेच, गेल्या निवडणुकीमध्ये घटलेली आमदारांची संख्या यामुळे भाजपकडून कोणतीही जोखीम स्विकारली जात नाहीये. यावेळीच्या निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये आपचा प्रभाव देखील वाढताना दिसत आहे. २०१७ च्या निवडणुकांमध्ये आपला शून्य जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी अनेक सर्व्हेंमध्ये आपच्या जागा वाढणार असल्याचे दिसत आहे. अशात, आपचा वाढता प्रभाव आणि प्रमुख नेत्यांनी निवडणुकीमधून घेतलेली माघार यामुळे भाजपची धकधक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने भाकरी पालटण्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने