सोनेरी केसांची राजकुमारी आणि तांबडा-पांढरा!

कोल्हापुर: रमंड-नेदरलँड इथल्या पहिल्या आयुर्वेद काँग्रेसची गोष्ट. जगभरातून आलेल्या डॉक्टरांच्या या परिषदेत माझे बीजभाषण झाल्यानंतर मी खाली उतरलो, तसे बरेच डॉक्टर्स माझ्याभोवती गोळा झाले. प्रशंसा, अभिनंदन वगैरे स्वीकारणे सुरू असतानाच सर्बिया देशातील माझे स्नेही डॉ. ब्रँको यांनी एका सुंदर उत्साही तरुणीची मला ओळख करून दिली. ‘या डॉ. गॉर्डेना मार्कोविच-पेट्रोविच, बेलग्रेडच्या शासकीय इस्पितळातील प्रीव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन विभागात काम करतात.’ पुढील दोन दिवस आम्ही परिषदेच्या वेगवेगळ्या सत्रांत भेटत राहिलो. गप्पा होत होत्या. आयुर्वेदाविषयी विविध शंकासमाधान वरचेवर डॉ. गॉर्डेना विचारत असत. सोबत आलेली त्यांची २ वर्षे वयाची मुलगी कटरिना मोठी गोड होती. तिला सांभाळण्यासाठी एक दाईही त्यांनी सोबत आणली होती. परिषदेत डॉ. गॉर्डेना यांची काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द वाखणण्यासारखी सर्वांनाच दिसत-जाणवत होती.पुढे युरोप आणि पाश्चात्त्य प्रगत देशांत भारतीय आयुर्वेद, योग यांचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. पंतप्रधान मोदी यांनी जागतिक योगदिन जाहीर केला, तेव्हा तर पहिला योग दिवस बेलग्रेड-सर्बिया इथल्या मंडळींनी उत्साहात साजरा केला. या समारंभाला भारतीय वकिलातीच्या राजदूत श्रीमती राजिंदर कौर हजर होत्या. त्यांनी या योग दिवसाच्या नियोजनातील डॉक्टरांचा सहभाग आणि उत्साह पाहून सर्बियन असोसिएशन फॉर आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ. ब्रँको चिचीच यांना एक खूशखबर दिली. भारतीय वकिलातीतर्फे एका सार्बियन डॉक्टरला भारतात एक महिना आयुर्वेद प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप देत असल्याची घोषणा केली. सर्बियातील या सर्व टीमचा तो सन्मानच होता. या डॉक्टरांपैकी डॉ. गॉर्डेना मार्कोविच भारतात जाऊन आयुर्वेद शिकण्यासाठी तयार होत्या. मुलगी कटरिनाला तिच्या आज्जीकडे सोपवून त्या महिन्याच्या प्रशिक्षणासाठी सज्ज झाल्या.भारतीय वकिलातीने राजस्थान आयुर्वेद संस्थान मध्ये त्यांचे प्रशिक्षण निश्चित केले. मात्र, डॉ. गॉर्डेनानी या प्रस्तावाला चक्क नकार देत कोल्हापूरला डॉ. सुनील पाटील यांच्याकडे मला आयुर्वेद शिकायला आवडेल, असे सांगितले आणि भारतीय वकिलातीने माझ्याशी संपर्क साधला. तसेही माझ्याकडे विविध देशांतील विद्यार्थी आयुर्वेद शिकण्यासाठी येत असतातच; पण तशी कोणाची शिफारस नसताना डॉ. गॉर्डेना यांना माझ्याकडे शिकावेसे वाटले त्याला कारण, माझे ‘त्या’ परिषदेतील व्याख्यान आणि भेटींमधील चर्चाच होत्या, हे कळाले. पुढे व्हिसा वगैरे सर्व सोपस्कार झाल्यावर डॉ. गॉर्डेना कोल्हापुरात आल्या. त्यांचे दिवसभर प्रशिक्षण सुरू झाले.

आयुर्वेदिय औषधी निर्माण, नाडी परीक्षा, पंचकर्म आदी सर्व विभागातील त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. दिवसभर या प्रशिक्षणानंतर घरी आमच्या ‘सौं’च्या हाताखाली स्वयंपाकघरातील धडे सुरू झाले. हळूहळू गॉर्डेना चक्‍क पोळ्या लाटायल्या शिकल्या, पोहे बनवायल्या शिकल्या. रोज सकाळी घरातून बाहेर पडताना त्या कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे, यावर माझ्या पत्नीशी चर्चा करत. कारण, युरोपात जे कपडे-पेहराव फॉर्मल असतो, तो भारतात सेरेमनीयल, तर भारतात जो सेरेमनीयल पोशाख असतो तो युरोपात फॉर्मल वापरतात. त्यामुळे बऱ्याच वेळा गॉर्डेना यांचा गोंधळ व्हायचा. त्या जेवढ्या हेल्थ कॉन्शस होत्या तेवढ्याच कॉस्च्यूम कॉन्शस पण! समस्त स्रियांप्रमाणे टापटिप आणि दक्ष-काळजीपूर्वक वागणे पण!

एका रविवारी कोल्हापुरातील एका आयुर्वेद सभेसाठी आम्ही गेलो होतो. कार्यक्रम अद्याप सुरू व्हायचा होता. चहापान झाल्यावर आम्ही स्थानापन्न झालो. दरम्यान, माझे एक जुने डॉक्टर मित्र अशोक आले. त्यांनी डॉ. गॉर्डेनाकडे पाहून मला एकदम विचारले, ‘अरे! ही सोनेरी केसांची राजकुमारी कोण?’ मी पण एकदम चक्रावलोच. खरेच, गॉर्डेना हे कुणावरही चटकन प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व होते. तसेही, सर्बियन महिला या जगातील अत्यंत सुंदर मानल्या जातातच! गॉर्डेनाचा जन्म बेलग्रेडचा. सर्व शिक्षणही तिथलेच.खेळांची आवड, ज्युदो-कराटे खेळात प्रावीण्य, राष्ट्रीय ज्युदो चॅम्पियन, ब्लॅक बेल्ट आणि कराटेमधील अनेक पुरस्कार वगैरे करत तिला मेडिकललाही सहज प्रवेश मिळाला. पदवीनंतर तिने सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन या विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन बेलग्रेड शासकीय रुग्णालयात काम सुरू केले. दरम्यान, लग्न होऊन एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला; पण याच काळात दुर्दैवाने चंचल पतीने घटस्फोट दिला आणि गॉर्डेना एकटी पडली. मात्र न खचता आईच्या मदतीने तिने मुलीला वाढवत, नोकरी करत घर सांभाळले. एवढंच नव्हे, तर नवनवीन गोष्टी शिकायला तर एका पायावर नेहमी सज्ज असे. मुळूमुळू रडत न बसता ती समाजात लढत उभी राहिली होती. खिलाडूवृत्ती त्यांच्या आयुष्याला दिशा देत होती. आताही, आमच्या मित्रांनी तुम्हाला सोनेरी केसांची राजकुमारी ही पदवी देऊन टाकलीय, असं सांगताच तिशी-बत्तीशीतल्या गॉर्डेना चक्क सोळा वर्षांच्या मुलीसारख्या लाजल्याच!

डॉ. गॉर्डेना यांचं प्रशिक्षण संपत आलं तेव्हा त्या जणू आमच्या कुटुंबातील एक सदस्यच बनल्या होत्या, इतक्या त्या आमच्यात रमल्या होत्या. रोज रात्री त्या त्यांच्या मुलीशी व्हिडीओ कॉन्फन्सिंगवर बोलताना आम्हीही पाहायचो, तिचं मातृहृदय भावना-वियोगाने किती कालवायचं ते! आणि जाणवायचं, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देशातील स्त्री असो, शेवटी आई ती आईच!या कालावधीतच आमचे भाचे डॉ. आदित्य यांचं लग्न ठरलं होतं, डिसेंबरच्या अखेरीस मुहूर्त होता. गॉर्डेना यांनी लग्नासाठी हजर राहून भारतीय मराठी संस्कृतीत लग्न सोहळा कसा होतो तो पाहायचा योग होता. मात्र, ख्रिसमसपूर्वी त्यांना मायदेशी परतायचं होतं आणि त्यांचं तिकीटही बुक झालं होतं. दरम्यान, आपल्या संस्कृतीप्रमाणे आमच्या भाच्यासाठी आम्ही केळवण आयोजित केलं होतं. आमच्या घरात पाहुण्यांची गजबज झाली. गॉर्डेना आत्तापर्यंत बहुतेक नातेवाईकांच्या परिचयाच्या झाल्या होत्या. आमच्या घरात पहिल्या मजल्यावर पंगती उठत होत्या. मुलं वाढायचं काम करत होती. गॉर्डेना चक्क स्वतः खालून वर एक एक पदार्थ घेऊन जात होत्या. पंगतीत वाढायलासुद्धा त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही. एक गोरी मॅडम आपल्याला जेवण वाढतेय, याचं आमच्या नातेवाईकांना खूप अप्रुप वाटत होतं. कार्यक्रम, भोजन पार पडलं, पाहुणे पांगले. सर्व विधी, आहेर करणं वगैरेही आटोपलं. गॉर्डेना बारकाईने सगळ्या गोष्टी कुतुहलाने पाहत होत्या.

घर रिकामं झाल्यावर आम्ही थोडे निवांत झालो. गप्पा मारताना गॉर्डेनांनी ‘एक शंका विचारू का?’ म्हटल्यावर मी म्हटलं ‘विचारा!’ त्यांनी विचारलं, ‘सर, व्हॉट इज धिस तांबडा-पांढरा?... पिपल अपस्टेअर्स रिपिटेडली आस्किंग मी...’ या गॉर्डेना यांच्या बाळबोध; पण नेमक्या प्रश्नावर मी व माझी पत्नी खळखळून हसू लागलो. ‘गॉर्डेना, वॉट यू सर्व्ह, इन डिफरंट कलर्ड लिक्वीडस्, वीच वेअर व्हाईट अँड रेड... आर डिफरंट करीज फेमस इन नॉनव्हेज कुजिन इन कोल्हापूर!’ या उत्तरावर त्यांचं शंकासमाधान झाल्यासारखं वाटलं. कारण, मग गॉर्डेनाही आमच्या हास्यात सामील झाल्या. मात्र, आपला तांबडा-पांढरा ही काही केवळ वर्णन करण्याची गोष्ट आहे?... मी ‘सौ’कडे पाहिलं. तिने गॉर्डेनासह आम्हा राहिलेल्या घरच्या मंडळींसाठी जेवणाची ताटं वाढली. जेवायला सुरुवात करताना गॉर्डेनाला म्हटलं, ‘नाऊ फर्स्ट टेस्ट तांबडा-पांढरा.....त्यांनीही त्यांच्या पद्धतीने चमच्याने चाखण्याऐवजी एकेक करून आमच्यासारखी रश्श्याची वाटी तोंडाला लावली आणि उत्स्फूर्तपणे उद्‌गारल्या.....

‘वॉव, इटस् फंटास्टिक!’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने