मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या जवळपास वर्ष-दीडवर्षापासून कारागृहात आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांच्यावर ईडी, सीबीआयने कारवाई केली आहे. अनेकदा त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलेला आहे. याच प्रकरणात आता एक नवा ट्वीस्ट आला आहे.अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांचंही नाव या प्रकरणात आरोपी म्हणून आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता ऋषिकेश यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. ऋषिकेश देशमुखही या मनी लाँडरिंग प्रकरणातले आरोपी होते. त्यांना ईडीने यापूर्वी समन्सही बजावलं होतं. मात्र ते कधीही ईडीसमोर हजर झाले नाहीत.
फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून या प्रकरणांचे धागेदोरे मुंबई पोलिसांतले अधिकारी सचिन वाझे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोचले. अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना अटक करण्यात आली.