मुंबई - अभिनेता वरुण धवनचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट सुपरहिट ठरणार असा अंदाज वर्तवला जात आहे. वरुण सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. तसेच त्याने एक धक्कादायक खुलासा केला. वरुण एका आजाराशी सामना करत असल्याचं त्याने सांगितलं.
इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२२’ या कार्यक्रमामध्ये वरुणने त्याला असलेल्या आजाराबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजाराचा मला सामना करावा लागला. या आजाराचा सामना करत असलेली व्यक्ती आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकत नाही.” वरुणने कोविडनंतर काम करण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.या आजाराबरोबर काम करणं वरुणला कठिण झालं. पण काम करण्यावर त्याने अधिक भर दिला. काही दिवसांपूर्वीच आपल्याला हा आजार आहे याचा मी स्वीकार केल्याचं वरुण धवनने सांगितलं. “आयुष्यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं. पण इथे तर माझ्या शरीराचा तोल जात आहे.” असंही वरुण म्हणाला.वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजारामुळे शरीराचा तोल जातो. या आजाराचा परिणाम कानावर तसेच मेंदूवरही होतो. मेंदूवर काही अंशी परिणाम होत असल्याने या आजाराशी सामना करत असलेल्या व्यक्तीला चक्कर येते.