शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बहुप्रतीक्षित ‘पठाण’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरीलही काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तसंच शाहरुख खानने त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं रिटर्न गिफ्ट दिलं. या दिवशी किंग खानच्या ‘पठाण’ चा टीझर प्रदर्शित झाला. त्यापाठोपाठ महिन्याभराच्या आतच या चित्रपटाबद्दल आणखी एक अपडेट समोर आली आहे.यशराज फिल्म्स निर्मित ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. आता चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे, जी ऐकल्यावर चाहते खूप खूश झाले आहेत आणि सोशल मीडियावर ‘पठाण’ हा हॅशटॅगही ट्रेंड करू लागला आहे. या चित्रपटाला विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी या लोकप्रिय जोडीने संगीत दिले आहे. चाहते ‘पठाण’च्या म्युझिकची आतुरतेने वाट पाहत असताना शेखरने त्याच्या ट्विटर हँडलवर याबाबत एक मोठी घोषणा केली आहे.शेखरने ट्विट केले की, “पठाणचा साउंडट्रॅक लवकरच तुमच्या भेटीला येईल.” मात्र ही बातमी देत असताना शेखरने कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. शेखरच्या या ट्विटनंतर चाहते खूप या चित्रपटासाठी आणखीनच उत्सुक झाले आहेत. एका नेटकऱ्याने शेखरला विचारले, “कोणते गाणे येत आहे?”, तर दुसरा म्हणाला, “ट्रेलरपूर्वी गाणे रिलीज करणे ही चांगली स्ट्रॅटेजी आहे.” त्याचप्रमाणे अनेक नेटकरी रिलीजच्या तारखेबद्दल अंदाज लावत आहेत.दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने