काँग्रेसकडे विकास आराखडाच नाही; मोदींची टीका

गुजरात : ‘गुजरातच्या विकासासाठी काँग्रेसकडे कोणताही आराखडा नाही. त्यामुळे जनतेने येत्या निवडणुकीत काँग्रेससाठी आपले मत वाया न घालता भाजपची निवड करावी,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गुजरातमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोदी यांनी आज भाजपचा जोरदार प्रचार करताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रातील अमरेली येथे पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतली. गुजरातमध्ये भाजप प्रबळ असला तरी अमरेली जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील पाचही विधानसभा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात बोलताना मोदी यांनी, या भागासाठी काँग्रेसने काहीही केले नाही. ते म्हणाले,‘‘गुजरातला सामर्थ्यवान बनविण्यासाठी भाजप सरकारने अनेक कामे केली आहेत. आता मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. ही झेप घेण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. त्यांनी तुमच्यासाठी काहीही चांगले केलेले नाही. काँग्रेसचे नेते तुम्हाला विकासाच्या मार्गावर नेतील, अशी अपेक्षा करू नका. कोणत्याही काँग्रेस नेत्याला विकास आराखड्याबाबत विचारा, ते काहीही सांगू शकणार नाहीत.’’


गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. आठ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. पंतप्रधान मोदींनी आज वेरावळ, धोराजी, अमरेली आणि बोताड येथे सभा घेतल्या. अमरेलीच्या जनतेने गेल्या निवडणुकीत अनेक अपेक्षा ठेवून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिले, मात्र मागील पाच वर्षांमध्ये त्यांनी केलेले एक तरी काम तुम्हाला आठवते का?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी जनतेला विचारला. काँग्रेसवर मत वाया घालविण्यात अर्थ नसून अमरेलीचा विकास करण्यासाठी भाजपची निवड करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकरी आणि इतर जनतेसाठी भाजप सरकारने राबविलेल्या योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.पाटकरांच्या सहभागावरून टीका

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतील सहभागावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ‘नर्मदा प्रकल्प तीन दशके रोखून धरणाऱ्या महिलेबरोबर काँग्रेसचे नेते पदयात्रा काढत आहेत. निवडणुकीसाठी मते मागण्यास काँग्रेसचे नेते आल्यास तुम्ही याबाबत त्यांना जाब विचारा. नर्मदा प्रकल्प झालाच नसता तर काय झाले असते?,’ असा सवाल मोदी यांनी विचारला.

पंतप्रधान मोदी म्हणाले...

  • भाजप सरकारने मच्छिमारांसाठी अनेक योजना आणल्या

  • देशातील माता, भगिनी आणि लेकींच्या सुरक्षा आणि विकासासाठी भाजप कटिबद्ध

  • गुजरातच्या संस्कृतीशी काँग्रेसला घेणेदेणे नाही

  • गुजरातमधील सध्याच्या विकासाचे श्रेय येथील जनतेच्या कष्टाला

  • ‘डबल इंजिन’ सरकारमुळे विकासाला वेग

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने