शेतकऱ्यांचा लेक! राजू शेट्टी केक घेऊन प्रवीण तरडेच्या घरी..

पुणे: लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे 'मुळशी पॅटर्न' असो 'धर्मवीर' किंवा 'हंबीरराव' प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. त्यांचे आपल्या गावावर, शेतीवर विशेष प्रेम आहे हेही त्यांच्या पोस्ट मधून दिसून आले आहे. आज प्रवीण तरडे यांचा 48 वा वाढदिवस.. यानिमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रवीण तरडेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हेमहाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते कायमच सरकारला धारेवर धरत असतात. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रवीण तरडेंसोबत त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. यात राजू शेट्टी हे प्रवीण तरडेंना केक भरवताना दिसत आहेत.याला त्यांनी अनोखे कॅप्शन दिले आहे. ''शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमी आंदोलन, मोर्चे, पदयात्रा याकाळात गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत असणारे, चित्रपटातील यशस्वी नाव, शेतक-यांचा मुलगा व अभिनेता प्रविण तरडे यांचा आज ४८ वा वाढदिवस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी साजरा केला,'असे त्यांनी म्हंटले आहे.

आज प्रवीण तरडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनोरंजन विश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छा येत असतानाच राजकीय विश्वातूनही त्यांना शुभेच्छा आल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. थेट राजू शेट्टी केक घेऊन तरडेंच्या घरी गेल्याने चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे. राजू शेट्टी आणि प्रवीण तरडे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा फोटो शेअर करत प्रवीण तरडेंचे कौतुक केले आहे. त्यांचे चित्रपटही राजू शेट्टी आवर्जून पाहत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने