केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी एक लाख ई-मेल

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वैचारिक, शैक्षणिक परंपरेला मोडीत काढून मेन राजाराम शाळेची इमारत यात्री निवास किंवा हॉटेल व्यवसायासाठी देण्याचा घातलेला घाट गंभीर आहे. म्हणूनच केसरकर यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे एक लाख ई-मेल पाठवण्याचा ठराव आज झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना नलवडे म्हणाले, ‘मेन राजाराम’ वाचवणे ही काळाची गरज आहे. या शाळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सध्या पालकमंत्री केसरकर हे छुप्या मार्गाने शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कोल्हापूरकर त्यांचा हा हेतू सफल होऊ देणार नाहीत. शाळा वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी ठेवावी.’यावेळी बोलताना मराठा महासंघाचे वसंत मुळीक म्हणाले, ‘सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या उत्कर्षासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळेसाठी यापुढील काळात कसलेही आंदोलन करायची वेळ आली तर सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी. शाळेसाठी खांद्याला खांदा लावून लढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दिलीप देसाई यांनी विविध आंदोलनाची माहिती दिली. शासनाच्या जागा दाखवणाऱ्यांना विरोध करून या जागा पुन्हा शासनाच्या ताब्यात कशा ठेवल्या, याची माहिती देत ‘मेन राजाराम’साठी अशाच प्रकारची लढाई लढण्याची तयारी असल्याची त्यांनी सांगितले.ॲड. पडवळ म्हणाले, ‘ही शाळा फार प्रथितयश होती. त्याकाळी सेंट झेवियर्समधून प्रवेश रद्द करून ‘मेन राजाराम’मध्ये दाखल झाल्याचे सांगताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. शासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेट दिला होता, मात्र आता वाट न पाहता पालकमंत्री केसरकर यांचा राजीनामा मागणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या मागणीला सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दात देत सहमती दर्शवली. यानंतरच केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख ईमेल पाठवण्याचा ठराव करण्यात आला.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे, तसेच या लढ्यात अग्रभागी राहण्याचे आश्वासन दिले. काही विद्यार्थ्यांनी तर पुढील शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये विद्यार्थी आणण्याची ग्वाही दिली.


जिल्ह्यातील नेत्यांना जाब विचारा

गोरगरिबांची शाळा बंद होत असताना जिल्ह्यातील नेते मात्र गप्प आहेत. त्यांना फक्त आपली मते हवी आहेत. इथून पुढे मत मागण्यास येणाऱ्यांना, मेन राजारामसाठी काय केले, असा जाब विचारण्याचे आवाहन अनेक माजी विद्यार्थ्यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने