पाऊण टक्का व्याजदरवाढ

वॉशिंग्टन : अपेक्षेनुसार,अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी बुधवारी आणखी पाऊण टक्के व्याजदरवाढ लागू केली. त्यामुळे व्याजदर ३.७५ टक्के ते चार टक्क्यांच्या टप्प्यात गेला. २००८ नंतरचा हा सर्वाधिक व्याजदर आहे. आतापर्यंत सलग चौथ्यांदा ही दरवाढ करण्यात आली असून, या वर्षातील ही सहावी वाढ आहे.फेडरल रिझर्व्ह आक्रमक भूमिका घेत, दरवाढ करणार हे अपेक्षितच होते. मात्र त्याचवेळी चलनवाढ जास्त असल्याने आगामी काळात दरवाढीचे सत्र सुरू राहणार असल्याचे संकेतही देण्यात आले. त्यामुळे अमेरिकी शेअर बाजारात निराशा दिसून आली आणि गुंतवणूकदारांनी विक्रीला सुरवात केली. त्यामुळे बाजारात मोठी घसरण दिसून आली.


फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अद्यापही महागाई दर चढाच असल्याने व्याजदरवाढ करणे आवश्यक आहे, त्यामुळे आणखी काही काळ तरी दरवाढ थांबवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र व्याजदर वाढीचे प्रमाण हळूहळू कमी करण्याचे तसेच पुढील महिन्यात दरवाढ इतकी मोठी नसण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. महागाई आणि विकासाचा दर यांचे संतुलन साधण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे असे त्यांनी सांगितले.अमेरिकेत गेल्या चाळीस वर्षांतील सर्वाधिक महागाई झाली असून, महागाई कमी करण्यासाठी फेडने आक्रमक धोरण स्विकारत व्याजदरवाढीचा तडाखा लावला आहे. सप्टेंबरमध्ये महागाई दर ८.२ टक्के होता. तो दोन टक्क्यांवर आणण्याचे फेडचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी व्याजदरवाढ केली जात आहे. अमेरिकेतील व्याजदरवाढीच्या अनुषंगाने जगभरातील इतर देशांच्या मध्यवर्ती बँकाही व्याजदरवाढ करतात, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे जगभरात मंदी येण्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.सध्या अमेरिकेत बेरोजगारी नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे मंदीची भीती कमी झाली आहे, त्यामुळे बाजार पुन्हा उसळी घेऊ शकतात, असे मत गुंतवणूक धोरणतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले.

भारतीय बाजारावरील परिणाम

गुंतवणूक धोरणतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार म्हणाले, भारतात कर्ज वितरण, भांडवली खर्च आणि वाहन विक्री यात मोठी वाढ दिसून आल्याने अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम राहण्याची शक्यता आहे. बँका, भांडवली वस्तू आणि वाहन क्षेत्रातील शेअरचे भाव कमी झाल्यावर त्यांची खरेदी वाढू शकते.

फेडने या वर्षी सहावेळा केलेली व्याजदरवाढ टक्क्यांत

  • २ नोव्हेंबर - ७५ अंक - ०.७५

  • २१ सप्टेंबर - ७५ अंक - ०.७५

  • २७ जुलै - ७५ अंक - ०.७५

  • १६ जून - ७५ अंक - ०.७५

  • ५ मे - ५० अंक - ०.५०

  • १७ मार्च - २५ अंक - ०.२५

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने