क्रिती सेनॉन, करीना कपूर, तब्बू पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘या’ नव्या चित्रपटाची घोषणा

मुंबई : तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन या तिघीजणी वेगवेगळ्या दशकातल्या आघाडीच्या अभिनेत्री. प्रत्येकीच्या अभिनयाची शैली वेगवेगळी, पण या तिघींनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर ‘लीडिंग लेडीज’ पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.या त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘द क्रू.’ या चित्रपटात या आघाडीच्या नायिका आपल्याला स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. संघर्ष करणाऱ्या एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘द क्रू’ एक मजेशीर विनोदी चित्रपट असेल. या चित्रपटाची कथा तीन महिलांभोवती फिरणार आहे. यात आपापल्या भूमिकेत या तिघीजणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अतूट प्रयत्न करत असतात. परंतु, त्यांच्या नशिबी अनोखी परिस्थिती निर्माण होते आणि त्या खोट्याच्या जाळ्यात अडकतात, असे या चित्रपटाचे कथानक आहे.या चित्रपटाची निर्मिती ‘वीरे दी वेडिंग’च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर या करणार आहेत. तर राजेश कृष्णन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाबद्दल या तिघीही फार उत्सुक आहेत. याबाबत बोलताना क्रिती म्हणाली, “तब्बू मॅम आणि करीना या दोन प्रतिभावंतांसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. मी नेहमीच त्यांचे काम पाहत आले आहे आणि त्यांच्या कामाचे मला कौतुक आहे. मला नेहमीच एक मजेशीर आणि अनोखा महिलाप्रधान चित्रपट करायचा होता आणि या चित्रपटाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होत आहे.”

तर करीना कपूर म्हणाली, “‘वीरे दी वेडिंग’चे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. रिया आणि एकतासोबत काम करण्याचा हा एक छान प्रवास होता. त्यामुळे जेव्हा रिया तिचा नवीन प्रोजेक्ट ‘द क्रू’ घेऊन माझ्याकडे आली तेव्हा मला खूप उत्सुकता होते. यात मला तब्बू आणि क्रिती या दोन उत्कृष्ट कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत आहे. मी हा प्रोजेक्ट सुरू करण्यास उत्सुक आहे.”तब्बू म्हणाली, “मजा मस्ती, आनंद, पात्रांमधील चढ-उतार अशी अनेक या चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. ही एक रोलर कोस्टर राईड असणार आहे आणि मी त्यावर स्वार होण्याची वाट पाहत आहे.” हा चित्रपट फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने