पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ऋषी सुनक याचं भारतीयांना 'गिफ्ट'

नवी दिल्ली - ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुण व्यावसायिकांना दरवर्षी ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी तीन हजार व्हिसा देण्यासाठीच्या प्रस्तावाला परवानगी दिली आहे. असा लाभ घेणारा भारत हा पहिला व्हिसा-राष्ट्रीय देश असल्याचे ब्रिटिश सरकारने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ब्रिटनकडून याला संमती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी हे गिफ्ट मानलं जात आहे.या संदर्भात गेल्या वर्षी ब्रिटन-भारत मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिपवर सहमती झाली होती. ब्रिटन-इंडिया यंग प्रोफेशनल्स योजनेअंतर्गत १८ ते ३० वयोगटातील तीन हजार उच्चशिक्षीत भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये येऊन दोन वर्षे काम करण्याची ऑफर देण्यात आली होती,' असे ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.गेल्या महिन्यात भारतीय वंशाचे पहिले ब्रिटीश पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुनक आणि मोदींची जी-२० परिषदेतील भेट पहिलीच भेट होती. 'बाली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटलं होतं.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील जवळपास कोणत्याही देशापेक्षा ब्रिटनचे भारताशी अधिक चांगले संबंध आहेत, असे त्यात म्हटले आहे. ब्रिटनमधील एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक चतुर्थांश विद्यार्थी भारतातील असून, ब्रिटनमध्ये भारतीय गुंतवणुकीमुळे ९५ हजार जणांना नोकऱ्या मिळतात. ब्रिटन सध्या भारताबरोबर व्यापार कराराची बोलणी करत आहे.दरम्यान हा करार झाला तर अशा प्रकारचा युरोपीय देशाशी झालेला हा पहिलाच करार असेल. हा उद्योग करार ब्रिटन-भारत व्यापार संबंधांवर आधारित असेल, ज्याची किंमत आधीच 24 अब्ज पौंड असून यामुळे ब्रिटनला भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेता फायदा घेण्याची संधी मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने