लाख नोकऱ्या, मोफत वीज... काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

गुजरात: गुजरातमध्ये निवडणुकीची धामधूम सुरुय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. काँग्रेसने आज आपला जाहीरनामा घोषित केला.राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत यांनी गुजरात निवडणुकीसाठी हा जाहीरनामा प्रस्तूत केला आहे. यामध्ये १० लाख नोकऱ्या आणि ३०० युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.काँग्रेसची आश्वासनं

काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलं की, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर रिक्त असलेले सर्व सरकारी पदं भरण्यात येतील. यामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येईल.काँग्रेसने ३०० युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. याबरोबच शेतकऱ्यांना १० तास मोफत वीज देण्यात येईल; २०११च्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये ५५ लाखांपेक्षा अधिक शेतकरी आहेत. त्यामध्ये २० लाख अल्पभूधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने हे आश्वासन दिलेलं आहे.यासह ५०० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर, मुलींसाठी आरक्षण आणि ३ हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात येतील, सरकारी विभागांमध्ये आऊटसोर्सिंग बंद करुन जुनी पेन्शन सुरु करण्यात येईल, हे मुद्दे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

तिरंगी लढत

दरम्यान यावर्षी गुजरातमध्ये तिरंगी लढत होईल, असं चित्र आहे. आम आदमी पक्षाने मागील काही दिवसांपासून गुजरातमध्ये चांगलंच लक्ष घातलंय. दिल्ली आणि पंजाबमधील काही मंत्री कायम गुजरात दौऱ्यावर असायचे. मागच्या वेळी चांगले यश मिळवेला काँग्रेस आणि तयारीनिशी उतरलेला 'आप' भाजपला कशी टक्कर देतात, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने