सोलापूर : सोशल मीडिया असो की जाहीर सभा, प्रत्येक ठिकाणी अन् प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता होती, ‘भीमा’चे काय होणार? भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आज ‘पुन्हा मुन्ना’वर तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल सहा हजार ७०० मताधिक्याने या कारखान्यावर भाजप खासदार व कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराला तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
‘ठरलंय नक्की, हॅट्ट्रिक पक्की’च्या स्लोगनने खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवाराने या निवडणुकीत उडी घेतली होती. खासदार महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक यंदा पहिल्यांदाच ऊस उत्पादकच्या पुळूज मतदार संघातून निवडणूक आखाड्यात उतरले होते. या निवडणुकीच्या माध्यमातून मोहोळच्या राजकारणात व सहकारात त्यांची एंट्री झाली आहे. या निवडणुकीत त्यांना १० हजार ६२९ मते मिळाली आहेत. कारखान्याचे भावी चेअरमन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. खासदार महाडिक यांच्या भीमा परिवाराला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची खंबीर साथ मिळाली. त्यामुळे मोहोळ तालुक्यात आगामी काळातील निवडणुकांसाठी नव्या समीकरणांचा जन्म या निवडणुकीतून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय माजी सभापती विजयराज डोंगरे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी मोलाची साथ दिली.
भीमा कारखान्यात परिवर्तनाची लाट असल्याचे सांगत माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले. या पॅनेलच्या प्रचाराची धुरा सुरवातीच्या टप्प्यात माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील व प्रणव परिचारक यांनी सांभाळली. नंतरच्या टप्प्यात उमेश परिचारक व शेवटच्या टप्प्यात माजी आमदार प्रशांत परिचारक निवडणूक प्रचारात उतरले होते. कामगारांची देणी, ऊस वाहतूकदारांची देणी, शेतकऱ्यांची देणी, भीमा कारखान्यावर झालेले कर्ज यासह अनेक मुद्दे प्रचारात उपस्थित करण्यात आले होते. सभासदांनी पुन्हा एकदा खासदार महाडिक यांच्या नेतृत्वावर ठामपणे विश्वास ठेवला असल्याचे निकालातून समोर आले आहे.