राहुल द्रविड ऐवजी लक्ष्मण घेणार टीम इंडियाची सूत्रे हातात

मुंबई : भारताचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता बीसीसीआयला आता न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवन तर टी 20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. याचबरोबर या दौऱ्यासाठी प्रशिक्षकांची टीम देखील दुसरी असणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह संपूर्ण प्रशिक्षक टीमला विश्रांती देण्यात आली असून द्रविड ऐवजी एनसीएचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण न्यूझीलंड दौऱ्यावर प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार आहे.भारतीय संघ 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. याचबरोबर टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा संपूर्ण प्रशिक्षक स्टाफला देखील विश्रांती देण्यात आली आहे.बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'लक्ष्मणच्या नेतृत्वातील एनसीएची संपूर्ण टीम, फलंदजी प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतूले देखील न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघासोबत जाणार आहे.' लक्ष्मण यापूर्वी झिम्बाब्वे आणि आयर्लंड दौऱ्यावर देखील टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून गेला होता.

दरम्यान, रोहित शर्मा हा बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी संघात पुन्हा परतेल. विराट आणि अश्विन देखील बागंलादेश दौऱ्यावर संघात परततील. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे, दोन कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा डिसेंबरपासून सुरू होत आहे. भारताचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान सेमी फायलनमध्येच संपुष्टात आले. इंग्लंडने भारताचा तब्बल 10 विकेट्सनी पराभव केला.न्यूझीलंड दौऱ्यावर न जाणारे खेळाडू ऑस्ट्रेलियात आपल्या सामानाची बांधाबांध करत आहेत. विराट कोहलीने अॅडलेड सोडले असून राहुल आणि रोहित देखील लवकरत परतीचे विमान पकडणार आहेत. बाकीचे खेळाडू हे सिडनी आणि पर्थवरून मायदेशी परततील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने