'कसौटी जिंदगी की' फेम सिद्धांत वीर सुर्यवंशीचं निधन, जीम मध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक

मुंबई :' छोट्या पडद्यावर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून घराघरात ओळखला जाणारा ४६ वर्षीय सिद्धांत वीर सुर्यवंशी आता आपल्यात राहिलेला नाही. शु्क्रवारी ११ नोव्हेंबर रोजी जीममध्ये वर्क आऊट करताना त्याला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यात त्याचा मृत्यू झाला.सिद्धांतला तातडीने इस्पितळात दाखल केलं गेलं,पण तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न डॉक्टर्सनी केले पण त्यांना त्यात यश आलं नाही. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतर आता जीममध्ये वर्कआऊट करताना तिसरा मृत्यू सिद्धांतचा झाला आहे. सिद्धांतने कुसुम, वारिस,सुर्यपुत्र करण मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याला त्या मालिकांमुळे ओळख मिळाली होती. टी.व्ही अभिनेता जय भानुशालीनं सिद्धांतच्या निधनाची बातमी कन्फर्म करत चाहत्यांना याविषयी सांगितले. सिद्धांत वीरच्या पश्चात त्याची पत्नी अलिसिया राऊत आणि दोन मुलं असा परिवार आहे. आपल्या फिटेनसची सिद्धांत खूप काळजी घ्यायचा असं बोललं जात आहे.जय भानुशालीनं सिद्धांत वीरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, ''मित्रा तु खूप लवकर गेलास''. मीडियाशी बातचीत करताना जय भानुशालीनं सिद्धांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्याला एका मित्राकडून सिद्धांतविषयी कळाल्याचं तो म्हणाला. जिममध्ये वर्कआऊट करताना जागीच सिद्धांतचा मृत्यू झाल्याचं जय म्हणाला.

सिद्धांत वीर सूर्यवंशीनं मॉडेल म्हणून आपली कारकिर्द सुरु केली होती. त्याला आनंद सुर्यवंशी नावानं देखील ओळखलं जायचं. प्रसिद्ध कुसुम मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 'कसौटी जिंदगी की', 'कृष्णा अर्जुन', 'क्या दिल में है' या मालिकांनंतर सिद्धांत वीर सूर्यवंशीनं आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिलं नाही. त्याचे शेवटचे टीव्ही प्रोजेक्ट 'क्यो रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'जिद्दी दिल' हे होते.सिद्धांतचं वैयक्तिक आयु्ष्य खूप वादग्रस्त राहिलं. सुरुवातीला त्यानं इरा नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं.पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २ वर्षांनी तो अलिसिया राऊतच्या प्रेमात पडला. त्यानं तिच्याशी लग्न केलं. पहिल्या लग्नापासून सिद्धांतला एक मुलगी होती. आणि दुसऱ्या लग्नापासून एक मुलगा आहे. दोन्ही मुलांची देखभाल अलिसिया आणि सिद्धांतच करायचे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने