“ते हिंदू आहेत पण…” ब्रिटनच्या उच्चायुक्तांचं ऋषी सुनक यांच्यावर भाष्य; म्हणाले, “सुनक पंतप्रधान झाले कारण…”

ब्रिटन: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची धुरा मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक सांभाळत आहे. लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनक यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्त एलेक्स इल्लीस यांनी “इंडिया टुडे कॉन्क्लेव’ या कार्यक्रमात बोलताना सुनक यांच्यावर भाष्य केलं आहे. सुनक हे पंजाबी वंशाचे हिंदू आहेत. मात्र, त्यांचं हृदय आणि मन ब्रिटिश आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.“आधुनिक इंग्लंड वैविध्यपूर्ण आहे. सुनक हे शीर्षस्थानी पोहोचले कारण ते त्यासाठी योग्य आणि सक्षम व्यक्ती आहेत. त्यांच्या प्रतिभेमुळेच ते शक्य झालं आहे”, असे एलेक्स यांनी म्हटले आहे. यावेळी ब्रेक्झिटनंतर इंग्लंड-भारत संबंधांवरदेखील राजदुतांनी प्रतिक्रिया दिली. “हे भूराजकीयदृष्ट्या तणावपूर्ण जग आहे. आम्हाला स्थलांतर आणि व्यापार धोरणांविषयी बऱ्याच संधी आहेत. बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध होते. त्याचप्रमाणे आता ऋषी सुनक यांच्यासोबतही इंग्लंडचे चांगले संबंध असतील”, असे त्यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमात विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबत एलेक्स यांना प्रश्न विचारण्यात आला. “हा आता सरकारी विषय राहिलेला नाही. प्रत्यार्पणावर तीन वर्षांपूर्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आता हा मुद्दा न्यायालयात आहे. इंग्लंड फरार लोकांसाठीचं स्थान व्हावं, अशी आमची इच्छा नाही. याबाबत लवकरच न्याय होईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.मुक्त व्यापार करारानुसार दोन्ही देशांमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत. इंग्लंडमधील उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसाठी आम्हाला भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेश हवा आहे, ज्यामुळे इंग्लडमधील ग्राहकांना त्याचा फायदा होईल, असेही एलेक्स यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने