राहुल गांधी यांनी लहानग्यांना करून दिली संगणकाची ओळख

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर, शंकरनगर आणि वाका फाटा येथील तीन मुक्काम खासदार राहुल गांधी यांची सकाळच्या सत्रातील तिसरी पदयात्रा गुरुवारी नियोजित वेळेवर सुरू झाली. यादरम्यान रस्त्यामध्ये भेटलेल्या दोन लहानग्या मुलांमध्ये ते बराच वेळ रमले. त्यांनी या मुलांना संगणकाची ओळख करून दिली.गुरुवारी सकाळी बर्‍यापैकी थंडी होती. पण वेळेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या राहुल व अन्य भारतयात्रींनी पहाटे ५.५५ वाजता कापसी गुंफ्यापासून पदयात्रा सुरू केली. ही पदयात्रा नांदेड शहराकडे निघाली असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन खेडूत लहानग्यांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची प्राथमिक विचारपूस केल्यावर राहुल यांनी त्यांना संगणकाबद्दल विचारले; पण त्यांना त्याची साधी ओळखही नसल्याचे लक्षात आल्यावर राहुल गांधी महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्यावर त्या मुलांना घेऊन बसले, गाडीतून आपला टॅब त्यांनी मागवून घेतला आणि तेथेच त्यांनी या मुलांना ‘टॅब’द्वारे संगणकाची प्राथमिक ओळख करून दिली. अचानक समोर आलेल्या या मुलांची नावे कळू शकली नाहीत. पण पदयात्रा थांबवून राहुल गांधी त्यांच्यामध्ये रमल्याचे दृष्य यात्रेकरूंसाठी सुखद होते.

सकाळच्या या पदयात्रेत भारत व प्रदेश यात्रींसह आसपासच्या भागातील ग्रामस्थ आणि तरुणांची मोठी गर्दी होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काकांडी येथून पदयात्रेत सहभागी झाले. त्याच ठिकाणी राहुल आणि इतर नेत्यांनी गरम चहाचा आस्वाद घेतला. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह, श्री.वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले. १३ कि.मी. अंतर पूर्ण झाल्यानंतर राहुल व इतर यात्री विश्रांतीसाठी थांबले. गुरुवारच्या सकाळच्या पदयात्रेतील आणखी एक ठळक बाब म्हणजे, अशोक चव्हाण यांची दुसरी कन्या सुजया चव्हाण यांनी या पदयात्रेत ५ ते ६ कि.मी. अंतर चालत पार केले. काँग्रेसचे स्थानिक प्रवक्ते संतुका पांडागळे हे नांदेडहून राहुल यांच्या कॅम्पपर्यंत गेले आणि पदयात्रेत सहभागी झाले.या सर्व पाहुण्यांच्या दुपारच्या भोजनाचे यजमानपद काँग्रेसचे आ.मोहन हंबर्डे यांच्याकडे आहे. भारतयात्रींना बुधवारच्या दोन्ही भोजनांमध्ये मटण-खिम्याच्या वेगवेगळ्या पाककृती खिलवण्यात आल्या. खिमा गोळे व खिमा करंजी या नव्या पाककृती भारतयात्रींच्या भोजनामध्ये होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने