अडीचशे ग्रॅम दारू पिणाऱ्यांना पकडू नका; दोन पेग दारू पिणं चुकीचं नाही; असं का म्हणाले माजी मुख्यमंत्री?

दिल्ली:  बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे  प्रमुख जीतनराम मांझीयांनी पुन्हा एकदा दारूबंदीवर प्रश्न उपस्थित केलेत. मांझींनी दारूबंदीच्या प्रक्रियेला न्याय देत थोडं-थोडं मद्यपान करण्याचा सल्ला दिलाय.जीतनराम मांझी म्हणाले, दारूबंदी वाईट नाही; पण ज्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी झाली. त्या प्रक्रियेत अनेक अनियमितता आहेत. दीडशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम दारू पिणाऱ्यांना पकडू नये. पोलीस ब्रेथ अनालायझर वापरून लोकांची चौकशी करताहेत. मात्र, ते फक्त एक मशीन आहे. कधी-कधी मशीन चुकीचं सांगतं, त्यामुळं निरपराध लोकही पकडले जातात, असं त्यांनी स्पष्ट केलं दिल्लीत हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मांझी पुढं म्हणाले, 'दारूबंदी कायद्यामुळं अर्धा लिटर किंवा चतुर्थांश दारू प्यायल्यानं अनेक गरीब लोक तुरुंगात आहेत. हे चुकीचं आहे, त्याचा आढावा घेतला पाहिजे. अशा लोकांना पकडू नये. दारूबंदीमुळं तस्कर श्रीमंत होत आहेत आणि गरीब तुरुंगात जात आहेत. हा गरीब जनतेवर अन्याय आहे.' जीतनराम मांझी यांच्या पक्षाचा महागठबंधन सरकारमध्ये समावेश आहे. त्यांचा मुलगा आणि HAM चे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन हे नितीश सरकारमध्ये मंत्री आहेत.

आधीच्या एनडीए सरकारमध्येही मांझींनी दारूबंदीवर प्रश्न उपस्थित केले होते आणि थोडं-थोडं प्यायचा सल्ला देत ते म्हणाले, दोन पेग दारू पिणं चुकीचं नाही. लोक गोंधळ घालतात आणि पकडले जातात, तर उच्च अधिकारी रात्री शांतपणे काही घोट घेतात आणि झोपी जातात. परंतु, ते कधीच पकडले जात नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, नितीश कुमार यांनी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि बैठकीत मद्यपान करणाऱ्यांसह दारू पुरवठा करणारे, तस्कर आणि विक्रेते यांच्यावर प्राधान्यानं कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने