हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेश: देशभरात विधानसभा निवडणुकांची चर्चा आणि तयारी सुरू आहे. तर एकीकडे गुजरात जिंकण्यासाठी आप आणि इतर पक्ष तयारी करत असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदानासाठी अवघे चार दिवस राहिले असतानाच काँग्रेसला मोठ खिंडार पडल्याचं दिसून आलं आहे.काँग्रेसच्या एकूण 26 नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. खुद्द मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिलीय. या निवडणुकांमध्ये राज्यात आपली छाप सोडत भाजपाच्या सत्तेला आव्हान देण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.चार दिवसांनंतर म्हणजेच येत्या 12 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर पुढील महिन्यात 12 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या अवघ्या चार दिवस आधी राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असतानाच या 26 नेत्यांनी पक्ष सोडणे म्हणजेच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपाचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग, भाजपाचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. काँग्रेस सोडणाऱ्या 26 नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने