नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानाचं अमेरिकेकडून तोंडभरुन कौतुक, असं काय म्हणाले पंतप्रधान?

इंडोनेशिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी  नुकतेच G-20 परिषदेत सहभागी होऊन भारतात परतले आहेत. त्यांचा हा दौरा अत्यंत यशस्वी मानला जात आहे. अमेरिकेनंही याला दुजोरा दिलाय.व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन पियरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, G20 शिखर परिषदेच्या घोषणेवर वाटाघाटी करण्यात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली. आजचं युग युद्धाचं नसावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्याचंही त्या म्हणाल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला इंडोनेशियातील बाली इथं दोन दिवसीय G20 शिखर परिषद संपन्न झाली. यात युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बायडेन  युनायटेड किंगडमचे नुकतेच पंतप्रधान झालेले ऋषी सुनक  यांच्यासह इतर जागतिक नेत्यांची उपस्थिती होती.

पियरे म्हणाल्या, "G-20 देशांच्या नेत्यांची ही शिखर परिषद खूप यशस्वी ठरली. भारत आणि अमेरिका इतर देशांबरोबरच अन्न आणि उर्जेच्या मुद्द्यांवर एकत्र काम करत आहेत. आम्ही सध्याच्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेतील आव्हानांबाबत जागतिक पातळीवर चर्चा केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका महत्वाची होती. आम्ही पुढील वर्षी भारताच्या G20 अध्यक्षपदाला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत."G20 शिखर परिषदेमध्ये पीएम मोदींनी 'नो वॉर'चा संदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. शिखर परिषदेनंतर संयुक्त जाहीरनाम्यात, नेत्यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनमधून रशियन सैन्यानं बिनशर्त माघार घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिखर परिषदेत पीएम मोदी म्हणाले, “मी वारंवार सांगत आहे, युक्रेनमध्ये युद्धविरामाचा मार्ग शोधावा लागेल आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत यावं लागेल. गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धानं जगभर हाहाकार माजवला आहे. त्यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला. आता आमची वेळ आलीय." दरम्यान, 1 डिसेंबरपासून भारत G20 चं अध्यक्षपद भूषवणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने