कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावर एका डंपरने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. तिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर आता कल्याणी कुरळे-जाधव मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. ‘प्रेमाची भाकरी’ असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा अपघात सांगली कोल्हापूर महामार्गाजवळील हालोंडी या कोल्हापूर जिल्ह्यातील गावाजवळ तिचा अपघात झाला. हा अपघात १२ नोव्हेंबरला रात्री ११ च्या सुमारास झाला. कल्याणी ही तिच्या दुचाकीवरुन घरी परतत होती. त्याचवेळी एका ट्रॅक्टरने तिला जोरदार धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि मोटार वाहन कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रकाशझोतात आली होती. तिने झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. ती महावीर कॉलेज परिसरात राहत होती. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहायची.