महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झाली.पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळवला. यात सुयश गरगटेने २:२० मिनिटे संरक्षण व ५ गुण मिळवत अष्टपैलू खेळी केली. रामजी कश्यपने ३:२० मिनिटे संरक्षण करताना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे सांभाळली. निहार दुबळेने आपल्या धारदार आक्रमणात ४ गुण मिळवले. मध्य प्रदेशकडून विवेक यादव व सागर यांनी प्रत्येकी २-२ गुण मिळवत एकाकी लढत दिली.महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने धुवा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने तेलंगणाविरुद्ध ७ गुण मिळवताना विजयाची पायाभरणी केली. रेश्मा राठोडने अष्टपैलू खेळ (२:१० मि. संरक्षण व ४ गुण) केला; तर रूपाली बडे व दीपाली राठोड (प्रत्येकी २:५० मि. संरक्षण) व अपेक्षा सुतार (२:४० मि. संरक्षण) यांनी महाराष्ट्राला मोठा विजय मिळेल याची काळजी घेतली. तेलंगणाच्या कृष्णम्माने दिलेली अष्टपैलू लढत अपुरी पडली.

जागतिक स्पर्धा घेण्याबाबत निर्णय घेऊ : अजित पवार

जागतिक खो-खो स्पर्धा घेण्याबाबत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.उस्मानाबाद येथे पुरुष व महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी ३२ देश सहभागी होणाऱ्या जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची विनंती केली होती. त्यास उत्तर देताना अजित पवार याप्रसंगी बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने